coronavirus : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे ‘स्मार्ट वर्कींग’, किराणा खरेदीसाठी केली ‘अॅप’निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 09:56 PM2020-04-12T21:56:12+5:302020-04-12T21:57:10+5:30
भिलवाडा पॅर्टनच्या धर्तीवर बारामती शहर सीलबंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बारामती पॅर्टनचा अवलंब करण्यात येतआहे.
बारामती - बारामती शहरात कोरोनाचे ६ रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत. त्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतरकोरोनाच्या रुग्णांचा संसर्ग वाढू नये यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यासाठी पवार यांनी प्रशासनाला काटेकोरपणे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने गेल्या तीनदिवसांपासून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. भिलवाडा पॅर्टनच्या धर्तीवर बारामती शहर सीलबंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बारामती पॅर्टनचा अवलंब करण्यात येतआहे.
त्यापाठोपाठ पोलीस प्रशासनाने आज पुणे ग्रामीण पोलीस दल कोवीड १९टीमच्या वतीने बारामती शहरामध्ये आॅनलाईन किराणा माल खरेदीसाठीअॅप्लीकेशनची निर्मिती केली आहे.त्यामुळे बारामतीकराना घराबाहेर पडण्याची संधीच न मिळण्यास प्रशासन यशस्वी पाउले टाकत आहे . त्यासाठी रविवारी (दि 12)पोलीसानी सोशल मिडीयाद्वारे हि संकल्पना, त्या आप ची लिंक नागरिकांपर्यंत पोहचवली .
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती देताना संगीतले कि , वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे. ‘किराणा होम डिलिव्हरी’ असे या अॅपचे नाव आहे. अवघ्या चार ते पाच मिनिटात हे अॅप इन्स्टॉल करता येते. त्यानंतर याच अॅपवर नागरिकांना कौटुंबिक गरजेसाठी हवे असलेल्या किराणामालाची यादी त्यावर पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित नागरिकाने त्याला आवश्यक असलेल्या किराणा मालाची आॅर्डर मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहून जवळच्या किराणा दुकानदार किंवा मॉलला पाठविण्याची सोय या अॅपमध्ये करण्यात आली आहे. हा किराणा माल आणण्यासाठी नागरिकांनी किराणा दुकानात, मॉलमध्ये जाण्याची गरज नाही. बारामती पॅर्टनमधील स्वयंसेवक, किंवा ते दुकानदार स्वत:ची माणसे पाठवून माल पोहोच करणार आहेत. नागरिकांनी या अॅपवर मागणी केलेल्या मालाची आॅर्डर दुकानदाराला त्याच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यानंतर दुकानदार आॅर्डर प्रमाणे आवश्यक माल ग्राहकाच्या घरी पोहोचविण्याची सोय करेल. यामध्ये दुकानदाराचा मोबाईलनंबर देखील अॅपवर आहे. त्यामुळे ग्राहक दुकानदारांना देखील संपर्क करून आवश्यक मालाची माहिती देऊ शकतात. शिवाय यादी पाठविल्यानंतर ग्राहकाचा नंबर दुकानदारांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दुकानदार देखील ग्राहकांनासंपर्क करू शकतील. पोलिसांच्या वतीने निर्मिती केलेल्या या अॅपचे बारामतीकरांनी स्वागत केले आहे. या अॅपमुळे नागरिकांना घराबाहेरपडण्याची आवश्यकता नाही. परिणामी शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन प्रभावीपणे यशस्वीपणे मदत होणार आहे. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचे संसर्ग कायमचा नष्ट होण्यासाठी पोलिसांचे हे नियोजन उपयुक्त ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, पोलीस निरीक्षक औदंबर पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना घरपोच किराणा माल देण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, बारामती नगरपरिषद आरोग्य विभागाने हे अॅप तयार केले आहे.