coronavirus : पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ आदेश असलेले काही जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 08:55 AM2020-03-23T08:55:35+5:302020-03-23T09:02:37+5:30
कुठे दिसल्यास हेल्पलाईनला संपर्क साधण्याचे आवाहन, पोलीसही ठेवणार नजर
पुणे : परदेशातून आलेले व ज्यांना ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचा आदेश दिला आहे. अशांपैकी काही जण त्यांच्या घरी आढळून आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे. अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या परंतु, कोणतीही लक्षणे नसलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन असा शिक्काही मारण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी पुणे शहरातील होम क्वारंटाइन केलेल्यांची यादी मागून घेऊन त्यांच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या १३६ पथके या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. या यादीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता बहुतांश लोक त्यांच्या घरी आढळून आले. मात्र, होम क्वारंटाइन चा आदेश दिलेल्यापैकी काही जण त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाही.
बेपत्ता झालेले हे नागरिक कदाचित त्यांच्या गावी अथवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नागरिकांनी तातडीने १८००२३३४१३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. जर त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.