coronavirus : ...म्हणून दुबईवरुन आल्यानंतर त्या दांपत्याचे विलगीकरण करण्यात आले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:03 PM2020-03-10T15:03:20+5:302020-03-10T15:06:17+5:30
दुबईवरुन आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्यानंतर आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
पुणे : कर्नाटक आणि पंजाबमध्ये काेराेनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातही दाेघांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत देशभरात 40 हून अधिक लाेकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे देशभरात खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबराेबर विमानतळांवर देखील माेठी खबरदारी घेण्यात येत आहे.
साेमवारी रात्री पुण्यातील दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. हे दाेघेही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई येथे फिरण्यास गेले हाेते. एक मार्च राेजी ते भारतात परतले. या दाेघांपैकी महिलेला त्रास झाल्याने त्यांनी काेराेनाबाबतची तपासणी करुन घेतली. यावेळी त्या महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. त्या महिलेच्या पतीची सुद्धा तपासणी करण्यात आली. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक सुद्धा दुबईला एका टुरसाेबत फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नागरिक विविध जिल्ह्यातील असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करुन त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे.
केंद्र शासनाने काेराेनाबाधित देशांची यादी जाहीर केली हाेती. त्या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. परंतु केंद्र शासनाच्या यादीत दुबई या देशाचे नाव बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्याने हे दाेघेही भारतात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी- कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील 3 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आता जगभरातील कुठल्याही देशातून नागरिक आल्यास त्याची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे.
दरम्यान हे दांपत्य ज्या व्यक्तीच्या टॅक्सीने मुंबईहून पुण्याला आले त्या व्यक्तीची सुद्धा माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील रात्री दवाखान्यामध्ये दाखल करुन घेण्यात आले आहे.