coronavirus : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून घेण्यात येतीये खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:53 PM2020-03-18T14:53:43+5:302020-03-18T15:26:44+5:30
काेराेनाचा सामना करण्यासाठी ट्रव्हल्स कंपन्या बसेस सॅनिटाईझ करुन मार्गावर साेडत आहेत.
पुणे : काेराेनाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने उपाययाेजना करताना दिसत आहे. पुण्यातील हाॅटेल देखील बंद ठेवण्याचा निर्णय आता हाॅटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यातच आता खासगी ट्रॅव्हल्स देखील आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवास सुरु हाेण्याआधी संपूर्ण बसमध्ये औषधांची फवारणी करत आहेत. त्याचबराेबर नागरिकांना देखील हॅण्ड सॅनिटाईझर देण्यात येत आहे.
पुण्यात आणखी एका महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून आता पुण्यातील काेराेनाग्रस्तांची संख्या 18 झाली आहे. तर राज्यातील आकडा 42 वर जाऊन पाेहचला आहे. काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी सर्वच स्तरातून खबरदारी घेण्यता येत आहे. या आधीच राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर आता पुण्यातील दुकाने तसेच हाॅटेल देखील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत.
पुण्यात राज्यभरातील विविध भागांमधून नागरिक येत असतात. त्यात खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता या ट्रॅव्हल्सने येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी देखील ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून घेण्यात येत आहे. पुण्यातील नवकार ट्रव्हल्सच्या सर्व बसेस मार्गावर जाण्याआधी सॅनटाईझ केल्या जातात अशी माहिती या ट्रव्हल्सचे मालक अतिश जैन यांनी दिली. त्याचबराेबर बस मार्गावर जाण्याआधी आणि मार्गावरुन आल्यावर देखील संपूर्ण बस स्वच्छ करुन सॅनटाईझ केली जात आहे. त्यात बसमधील पडद्यांपासून ते सीटपर्यंत सर्वच निर्जुंतिकरण केले जाते. तसेच प्रवाशांना देखील बसमध्ये प्रवेश करण्याआधी हॅन्डसॅनिटाईझरने हात स्वच्छ करण्यास सांगण्यात येत आहे.
दरम्यान पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने बाहेरील नागरिक आपआपल्या गावी परतले आहेत, तसेच पुण्यात येणाऱ्या ट्रव्हल्स देखील माेकळ्या येत आहेत.