Coronavirus: पुण्यात अॅन्टीजेन किटचा वापर, अर्ध्या तासात मिळणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:33 AM2020-07-03T03:33:19+5:302020-07-03T03:33:46+5:30
बुधवारी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोना-१९ बाधित रुग्णांवर त्वरीत उपचारासाठी आवश्यक अॅन्टीजेन किटचा वापर सुरु करण्यात आला.
पुणे : शहरात अॅन्टीजेन किटच्या वापरास सुरुवात झाली असून, यामुळे आता केवळ अर्ध्या तासात कोरोना पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा अहवाल प्राप्त होणार आहे. ५ अहवालाची पडताळणी करण्यासाठी त्याच व्यक्तींचे स्वॅब प्रयोगशाळेकडेही पाठविण्यात आले असून, हे अहवाल प्राप्त झाल्यावर अॅन्टीजेन किट वापरास सर्वत्र सुरुवात होणार आहे.
बुधवारी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोना-१९ बाधित रुग्णांवर त्वरीत उपचारासाठी आवश्यक अॅन्टीजेन किटचा वापर सुरु करण्यात आला. सध्या कोविड-१९ च्या चाचणीसाठी आर.टी.पी.सी.आर. ही एकमेव निदान चाचणी आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आता तपासणीअंती अॅन्टीजेन निदान होत असल्याची खातरजमा केलेली आहे.
या टेस्टमुळे निगेटिव्ह निदान करण्याचे प्रमाण ९९.३ ते १०० टक्के आहे. तर पॉझीटिव्ह निदान चे प्रमाण ५०.६ ते ८४ टक्के (रुग्णाच्या शरीरातील व्हायरल लोड नुसार) आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या प्रसंगी ही किट वापरुन निदान शक्य आहे. या टेस्टचा वापर कंन्टेंमेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये करता येणे शक्य आहे. फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व अन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी होणार आहे.