कोरोनावरची लस घेऊ की नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:45+5:302021-03-04T04:20:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असताना नागरिकांमध्ये याबद्दल शंका आहेत. लस कोणी घ्यावी किंवा ...

Coronavirus vaccine or not? | कोरोनावरची लस घेऊ की नको?

कोरोनावरची लस घेऊ की नको?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असताना नागरिकांमध्ये याबद्दल शंका आहेत. लस कोणी घ्यावी किंवा घेऊ नये, लस घेतल्यानंतर प्रवास करता येईल का, मोठ्यांनी लस घेतली तर लहान मुलांना संरक्षण मिळेल का, लक्षणेविरहित कोरोनाग्रस्त रुग्णांनी लस घेतल्यास काय परिणाम होतील असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. पहिल्या दिवसापासून सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाड, संकेतस्थळ बंद अशा अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवताना आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागे पडतो आहोत का, याबाबत सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय नटराजन म्हणाले, “तंत्रज्ञानातील अचूकता आणि वेग हे लसीकरण मोहिमेतील सर्वात मोठे आव्हान आहे. जनगणनेनुसार आपल्या देशात ४५-५९ वर्षे आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणीकृत संख्या शासनाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही देशात अशा प्रकारे समस्या उदभवलेली नाही.”

ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप म्हणाले की बायपास सर्जरी झालेले, स्टेन बसवलेले अनेक रुग्ण लसीकरण करुन घ्यावे की नाही, याबाबत साशंक आहेत. मात्र, त्यांनी लस घ्यायला काहीच हरकत नाही. कोणते आजार असलेल्यांनी लस घ्यावी आणि घेऊ नये, याची यादीही शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. रक्त पातळ करण्याची औषधे सुरु असलेल्या रुग्णांनी लसीकरणापूर्वी ह्रदयरोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

प्रश्न : तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी कोणते उपाय योजता येऊ शकतात?

-सॉफ्टवेअरमध्ये लसीकरणाची नेमकी वेळ मिळण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी. सध्या ‘फोरनून’ आणि ‘आफ्टरनून’ असे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. दर दिवशी शंभर जणांना लसीकरण करता येत असेल तर सकाळच्या वेळेत ५० आणि दुपारनंतर ५० अशी नावनोंदणी झाल्यास गोंधळ आणि गर्दी टाळता येऊ शकेल. सिनेमाचे तिकीट काढताना आपल्याला चित्रपटगृहाचे चित्र दिसते. आपल्याला हवी असलेली सीट, हवा असलेला टाईम स्लॉट निवडता येतो. लसीकरणाच्या सॉफ्टवेअरमध्ये तशी सुविधा उपलब्ध करुन द्यायला हवी.

प्रश्न : लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवता येऊ शकते का?

- भारताकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने काम केल्यास घरोघरी लसीकरण मोहीम राबवणेही शक्य आहे. अशी मोहीम राबवताना मनुष्यबळाचा विचार व्हावा. कोरोना रुग्णसंख्येचा गेल्या वर्षाचा अनुभव गाठीशी आहे. लसीकरणाच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

प्रश्न : मोठयांनी लस घेतल्यामुळे लहान मुलांना कोरोनापासून संरक्षण मिळू शकते का?

- एकूण लोकसंख्येपैैकी ७०-७५ टक्के लोकांचे लसीकरण झाल्यास किंवा कोरोना झाल्यास ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण होते. आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने हे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सध्या तरी लहान मुलांना संरक्षण मिळू शकेल, असे ठामपणे म्हणता येणार नाही. इंग्लंडमध्ये लहान मुलांवर लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्याचे निष्कर्ष लवकरच समोर येतील.

प्रश्न : कोरोना होऊन गेल्यानंतर लस घेता येईल का? लस घेतल्यानंतर प्रवास करता येऊ शकतो का?

- कोरोना होऊन गेल्यानंतर दोन महिने तरी लस घेता येत नाही. एकदा लस घेतली म्हणजे आपल्याला कवचकुंडले मिळाली, असेही नाही. विषाणूची जनुकीय रचना सातत्याने बदलत आहेत, कोरोना आटोक्यात येईल की रुग्णसंख्या वाढत राहील याबद्दल निश्चितता नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

------------------------

प्रश्न : लक्षणेविरहीत कोरोनाग्रस्त रुग्णांनी लस घेतल्यास काय परिणाम होऊ शकतो?

- लक्षणेविरहित कोरोनाग्रस्त रुग्णांनी सुरुवातीच्या टप्प्यात लस घेतल्यास कोणताही परिणाम दिसून येत नाही. कोरोना होऊन १०-१२ दिवस उलटल्यास शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात. कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनीही ठरावीक वेळेनंतर लसीकरण करुन घ्यावे.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र

Web Title: Coronavirus vaccine or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.