Coronavirus Vaccine : उत्स्फूर्त प्रतिसाद ! ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या चाचणीसाठी ६०० हून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 09:01 PM2020-09-21T21:01:36+5:302020-09-21T21:05:26+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित करण्यात आली आहे...
पुणे : ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी सुमारे ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सात जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी (दि. २२) पात्र स्वयंसेवकांना लसीचा डोस दिला जाईल, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित करण्यात आली आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारती रुग्णालय व केईएम रुग्णालयाच्या संशोधन केंद्रांत सुरू झाली आहे. तर ससून रुग्णालयामध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या प्रक्रियेला सोमवार (दि. २१) पासून सुरू झाली आहे. या चाचणीसाठी सुमारे ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. रुग्णालयाकडून त्यासाठी आवाहन करण्यात आले होते. दुरध्वनीद्वारे ही नोंदणी सुरू असून अजूनही स्वयंसेवकांकडून नोंदणीसाठी संपर्क साधला जात आहे. ससूनमध्ये १५० ते २०० जणांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांपैकी दररोज ८ ते १० जणांनाच दररोज बोलाविले जाणार आहे. त्यांच्या आरोग्यविषयक तपासण्या व रक्ताचे नमुने तपासणी करून लस दिली जाणार आहे. पण नोंदणी केलेल्या सर्वांनाच बोलाविले जाईल असे नाही. सोमवारी आठ जणांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड व अँटीबॉडी चाचणीही असेल. मंगळवारी सकाळी त्याचे अहवाल आल्यानंतर पात्र ठरलेल्यांना लसीचा डोस दिला जाईल. पुढील महिनाभर १५० ते २०० जणांना लस देण्याची ही प्रक्रिया सुरू राहील. लस दिलेल्या स्वयंसेवकांचा पुढील सहा महिने पाठपुरावा केला जाणार आहे,’ असे डॉ. तांबे यांनी सांगितले.
-------------
नोंदणी केवळ दुरध्वनीवरूनच
स्वयंसेवकांची नोंदणी केवळ दुरध्वनीवरूनच केली जात आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच तपासणीसाठीही स्वयंसेवकांची निवड केल्यानंतर त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले जाणार आहे. त्यामुळे थेट रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केले आहे.
-----------