Coronavirus Vaccine : कोरोनावरील 'कोविशिल्ड' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ससूनमध्ये सोमवारपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:57 PM2020-09-19T19:57:42+5:302020-09-19T20:10:24+5:30
भारतात सिरम इन्स्टिट्युटमार्फत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत..
पुणे : ससून रुग्णालयात 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सोमवार (दि. २१) पासून सुरूवात होणार आहे. यापूर्वीच भारती व केईएम रुग्णालयामध्ये या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्रॉझेनेका कंपनीकडून कोरोनावरील 'कोविशिल्ड' या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्युटमार्फत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. पुण्यातील भारती हॉस्पीटलमध्ये दि. २६ ऑगस्टपासून चाचणीला सुरूवात झाली. त्यानंतर केईएम रुग्णालय आणि आता ससून रुग्णालयात या चाचण्या होणार आहेत. ससूनमधील चाचण्यांना सोमवारपासून सुरूवात होणार आहे. सध्या या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. काही जणांनी यापुर्वीच नोंदणी केली आहे. आणखी स्वयंसेवकांची गरज असून त्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे. सुमारे १५० ते २०० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.
दरम्यान, या लसीच्या चाचणीदरम्यान ब्रिटनमध्ये एका रुग्णावर विपरीत परिणाम झाल्याने काही दिवसांपुर्वी जगभरातील चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. पण काही दिवसांतच चाचण्यांना पुन्हा हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे ससून रुग्णालयातही चाचण्यांना सुरूवात होणार आहे. आता पुण्यातीलच तीन रुग्णालयांमध्ये लसीचे परीक्षण होणार आहे. देशभरातील सुमारे १६०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. पुढील चार ते सहा महिने या चाचण्या सुरू राहणार आहेत.
-----------
चाचणीत सहभागी होण्यासाठी संपर्क - ८५५०९६०१९६, ८१०४२०१२६७
-----------
ससूनमध्ये सोमवार (दि. २१) पासून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. सुमारे १५० ते २०० जणांवर चाचणी केली जाईल. त्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे. इच्छुकांनी रुग्णालयांशी संपर्क साधावा.
- मुरलीधर तांबे, प्रभारी अधिष्ठाता, ससून रुग्णालय
------------