जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता लागणार आरटीओचे प्रमाणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 06:24 PM2020-03-26T18:24:14+5:302020-03-26T18:25:23+5:30
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता आरटीओचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आरटीओला ईमेल करावा लागणार आहे.
पुणे : संचारबंदी लागू करण्यात आल्याने वाहतुकीला पूर्णपणे बंदी आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या ने-आण करणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. पण त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे. त्यामध्ये आरोग्य, पोलीस, अग्निशमन, विविध विभागांच्या आपत्कालीन सेवा आदींचा समावेश आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू ची विक्री करणारी किराणा माल, भाजीपाला, औषधांची दुकानेही वगळण्यात आली आहेत.
या वस्तूंची ने आण करणाऱ्या वाहनांचाही यामध्ये समावेश आहे. पण या वाहनांना आता आरटीओ ची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी देण्यासाठी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना कार्यालयात यावे लागणार नाही. इ-मेल द्वारे अर्ज स्वीकारले जाणार असून त्यावरच परवानगीचे प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे, अशी माहिती विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
प्रमाणपत्रासाठी ई-मेल वॉर अर्ज पाठविताना त्यासोबत वाहनांची आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवावी लागतील. तसेच अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई मेल आय डी, वाहन क्रमांक, वाहन प्रकार, आदी माहिती नमूद करावी लागेल. संचारबंदीच्या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या ने-आण करण्यासाठीच वाहनाचा वापर केला जाईल. इतर कारणांसाठी वापर करणार नाही, असे स्वयंघोषणापत्रही द्यावे लागणार आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर लगेच परवानगी चे पत्र मेल केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
ई-मेल आयडी - rto.12-mh@gov.in