‘अनन्या’ मारणार कोरोनाचा विषाणू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:44 AM2020-06-09T02:44:07+5:302020-06-09T02:44:31+5:30
नॅनो तंत्रज्ञान : पुण्यातील डीआयएटीने बनविले विषाणूनाशक
पुणे : कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित विषाणूनाशक पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) संस्थेने बनवले आहे. हे विषाणूनाशक मानवी शरीरातही प्रवेश करण्यास प्रतिबंध करते, असा दावा संस्थेने केला आहे. ‘अनन्या’ असे या विषाणूनाशकाचे नामकरण केले असून, त्याचे उत्पादन लवकरच सुरु होणार आहे. डीआयएटी या अभिमत विद्यापीठातील फिजिक्स विभागप्रमुख डॉ. संगीता काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पृष्ठभागावरील कोरोनाचे विषाणू
नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. विषाणूची रचना लक्षात घेऊन सोप्या पद्धतीने सिल्व्हर नॅनो पार्टीकल आणि पॅरासिटीमॉलसारख्या औषधाचा वापर करुन ते बनविण्यात आले आहे. सात ते आठ तासात विषाणू नष्ट करण्याची क्षमता असून, चार ते पाच दिवसापर्यंत त्याचा प्रभाव राहतो. सुमारे १५० रूपयांत एक लिटर औषध तयार होते. यात अल्कोहोल नसते. फॅब्रिक, प्लॅस्टिक आणि धातूच्या वस्तूंवर हे प्रभावीपणे काम करते.
असा होतो कोरोना विषाणू नष्ट
सामान्य सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. ते हातावर लावल्यास विषाणूला प्रतिबंध होतो. तो समूळ नष्ट होत नाही. अनन्या विषाणूनाशकामुळे कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होतो, हे प्रयोगात सिद्ध झाले आहे. कोरोना विषाणू प्रोटीनच्या साह्याने मानवी शरीरात प्रवेश करतो. ‘अनन्या’ प्रोटीन नष्ट करतो. यामुळे पहिल्याच टप्प्यात विषाणू मरतो. सिल्वर नॅलो पार्टीकल दुसऱ्या टप्प्यात विषाणूचे प्रोटीन नष्ट करून त्याचे आवरण तोडून आत असलेले मेंब्रीन नष्ट करतात. त्यानंतर एनआरए मटेरीअल बाहेर आल्याने विषाणू मृत होतो.
आमच्या विद्यापीठात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. ‘अनन्या’मुळे हा विषाणू नष्ट करण्यास मदत होणार आहे. पेटंटसाठी आम्ही प्रक्रिया सुरु केली आहे.
- सी. पी. रामनारायण,
कुलगुरू, डीआयएटी
विषाणू मारण्यासाठी विविध प्रकारची विषाणूनाशके आहेत. त्यांचा वापर करून विषाणूवरील प्रोटीनचे आवरण नष्ट करता येऊ शकते. याला कोरोना विषाणूही अपवाद नाही.
- डॉ. अखिलेश मिश्रा,
माजी संचालक, एनआयव्ही