Coronavirus : पोलिसांची साप्ताहिक बैठक होणार प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:43 PM2020-03-16T23:43:46+5:302020-03-16T23:43:58+5:30
मंगळवारी होणारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक (टीआरएम) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही टीआरएम बैठक होणार आहे. त्याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिका-यांना दिल्या आहेत.
पुणे : कोरोना वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन शासन तसेच पोलिसांकडून होत आहे़ त्याची अंमलबजावणी आता पोलिसांनीही सुरु केली आहे. येत्या मंगळवारी होणारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक (टीआरएम) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही टीआरएम बैठक होणार आहे. त्याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिका-यांना दिल्या आहेत.
मंगळवारी सकाळी होणा-या टीआरएम बैठकीसाठी पोलीस आयुक्तालयातून सर्व वरिष्ठ अधिका-यांना एक लिंक पाठविण्यात आली आहे. ती त्यांनी डाऊन लोड करुन घेतली आहे़ त्याद्वारे ते आपल्या कार्यालयात बसून थेट पोलीस आयुक्तालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधणार आहे. सोमवारी रात्री सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी आपल्या कार्यालयात बसून या व्हिडिओ कॉन्फरन्सची चाचणी घेतली.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दर मंगळवारची साप्ताहिक बैठक सुरु केली. ती टीआरएम या नावाने ओळखली जाते. या बैठकीत शहरातील सर्व गुन्ह्यांचा आढावा घेतला जातो. चांगले काम करणा-यांचे कौतुक केले जाते तसेच ज्यांची कामगिरी चांगली नाही त्यांची कानउघडणीही केली जाते. या टीआरएम ची सर्वच अधिकाºयांना चांगलीच धास्ती असते. ही बैठक आजपर्यंत कधीही रद्द झालेली नाही. जर मंगळवारी एखादा मोठा कार्यक्रम असेल (राष्ट्रपती दौरा) तर ती बैठक दुसºया दिवशी घेतली जाते़ या बैठकीमुळे पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखांच्या कामगिरीत चांगली वाढ झाली असून त्यात सातत्य राहिले आहे. त्यामुळे या बैठकीला शहर पोलीस दलात विशेष महत्व दिले जाते. ती प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.