Coronavirus : कोरोना उपचारांसाठी जगभरातील डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 02:14 PM2020-03-20T14:14:27+5:302020-03-20T14:34:57+5:30
इंटरनेटच्या साह्याने व्हॉट्सअॅपसह विविध समाजमाध्यमांचा वापर
राजू इनामदार -
पुणे : जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जगभरातील अनेक डॉक्टर रोजच्या रोज परस्परांच्या संपर्कात आहेत. त्यासाठी माहितीजालाच्या (इंटरनेट) साह्याने विविध समाजमाध्यमांचा (व्हॉट्सअॅप व अन्य) वापर करत आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांबरोबरच खासगी रुग्णालयातील या विषयाशी संबंधित तज्ज्ञांचाही यात समावेश आहे.
रुबी रुग्णालयातील संसर्गजन्य आजार विभागातील तज्ज्ञ डॉ. अभिजित लोढा म्हणाले, मी स्वत: रोज अनेक देशांतील डॉक्टरांबरोबर बोलत असतो. ज्या देशात या आजाराचे रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर जास्त संवाद होत असतो. कोणत्या औषधांनी रुग्णाला फरक पडतो, कोणते औषध प्रभावी ठरते आहे, रुग्णांची लक्षणे, बरे होत असतील तर त्याची कारणे, आजार वाढत असेल तर त्याची कारणे या प्रकारचे संभाषण होत असते. त्याचा उपयोगही होत असतो.
............
कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या बाळाला संसर्ग होत नाही
डॉ. लोढा म्हणाले, संवादाबरोबरच जर्नल्स, संकेतस्थळांच्या माध्यमातूनही माहितीची देवाणघेवाण होत असते. गरोदर महिलेला कोरोना झाला असेल तर तिच्या बाळाला तो होतो का याविषयी काही दिवसांपूर्वी विचारणा होत होती. चीनमध्ये काही गरोदर महिलांची यादरम्यान प्रसूती झाली. त्यांच्या बाळांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे आता कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या बाळाला या आजाराचा संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले.
४त्याचप्रमाणे अमेरिकेतील एका महिला रुग्णाला एक नव्या प्रकारचे औषध दिले आहे. त्याचा परिमाण लवकरच कळेल. अमेरिकेतूनच एनईजेएम या नियतकालिकेच्या वतीने (न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिन) एक संकेतस्थळ चालवले जाते. त्यावर या आजाराबाबत सुरू असलेल्या संशोधनाची मिनिट टू मिनिट माहिती अद्ययावत केली जात असते.
.........
सतत जागृत राहावे लागते....
महापालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव वावरे हेही परदेशातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर समाजमाध्यमांच्या द्वारे बोलत असतात. ते म्हणाले, सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे औषधोपचारांविषयी नवे काही आहे का याबाबत सतत जागृत राहावे लागते. रुग्णांची लक्षणे सारखी आहेत का, कोणत्या उपचारांनी फरक पडतो आहे याविषयी देवाणघेवाण होत असते.