पालिकेच्या पुरस्कारांना कोरोनामुळे बसला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:12+5:302021-02-11T04:12:12+5:30
पुणे : महापालिकेकडून दरवर्षी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७ पुरस्कार दिले जातात. परंतु, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे पुरस्कार ...
पुणे : महापालिकेकडून दरवर्षी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७ पुरस्कार दिले जातात. परंतु, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे पुरस्कार थांबले आहे. पालिकेने पुरस्कार देण्यासंबंधी कार्यवाही करण्याची मागणी सांस्कृतिक क्षेत्रामधून केली जाऊ लागली आहे.
शहरात पालिकेच्या पुरस्कारांना महत्त्व आहे. पालिकेकडून दरवर्षी स्वरभास्कर, बालगंधर्व, पठ्ठे बापूराव, महर्षी वाल्मीकी, मौलाना अबुल कलाम, संत जगनाडे महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचे सोळा पुरस्कार दिले जातात. यासोबतच साहित्य पुरस्कारही दिला जातो. गेल्या वर्षी साहित्य पुरस्कार देण्यात विलंब झाला होता. पालिकेचे सर्व पुरस्कार देण्याकरिता तज्ज्ञांच्या समित्याही गठीत केलेल्या आहेत. या समित्यांची बैठक मागील दहा महिन्यांत होऊ शकलेली नाही. महापौरांनी या पुरस्कारांसाठी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही महिन्यांत कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर शासनाने लॉकडाउन शिथिल केले. शासकीय तसेच खासगी व्यवहार, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. महापालिकेचे कामकाजही सुरळीत सुरू झाले असून सांस्कृतिक क्षेत्रसुद्धा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरू केली आहेत. त्यामुळे कार्यक्रमही होऊ लागले आहेत. त्याच अनुषंगाने पुरस्कार देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
--
कोरोना काळात साहित्य पुरस्कारांसाठी प्रकाशक आणि लेखकांकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. ही पुस्तके परीक्षणासाठी समितीकडे पाठविली आहेत. वैचारिक लेखन, मुद्रितशोधक, अनुवाद, चरित्र आत्मचरित्र, कविता, नवोदित साहित्यिक, ललित लेख, कादंबरी, बालसाहित्य, विज्ञान आरोग्य, कथा, प्रवासवर्णन, आर्थिक, नाटक अशा लेखनासाठी पालिका पुरस्कार देते. या पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत.