कोरोनात कोमेजलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन’ला बहरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:37+5:302021-02-07T04:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे कमी झालेल्या गुलाबाच्या निर्यातीला ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बहार आली आहे. यंदाची मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे कमी झालेल्या गुलाबाच्या निर्यातीला ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बहार आली आहे. यंदाची मागणी कमी झालेली असली तरी ती सुरू झाली याचाच उत्पादकांमध्ये आनंद आहे. जपान, हॉलंड, नेदरलँड याबरोबरच दुबई व युरोपातही भारतातून गुलाबाची निर्यात होत आहे.
नि:सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबाची बाजारपेठ सध्या रुक्ष व कोरडी आहे. देशी गुलाबाची काडी लांबसडक नसते, त्यामुळे सुगंध असूनही त्याला परदेशात मागणी कमी असते. त्यामुळे गंध नसला तरीही भारतातून परदेशात जाणारा गुलाब परदेशी वाणाचाच आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला लाल रंगाच्या गुलाबाला सर्वाधिक मागणी आहे. त्यातही ‘ट्रेड सिक्रेट’ असे खास नाव असलेला ‘डच’ वाणाचा पण भारतात उत्पादित झालेला गुलाब परदेशात सर्वाधिक खपतो आहे.
जिल्ह्यात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या १० ते १२ इतकी आहे. गुलाब शेती करणाऱ्या उत्पादकांची संख्या मात्र काही हजारांमध्ये आहे. त्यातील काहीजणांनी एकत्र येत पॉली हाऊस तयार केली आहेत. पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड व अन्य काही जिल्ह्यातही गुलाब शेती होते. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील बंगळुरू परिसर हा पॉलिहाऊसमधील फुलशेतीसाठी देशात प्रसिद्ध आहे.
कर्नाटकचे गुलाब चेन्नईतून तर महाराष्ट्रातील गुलाब मुंबईतून परदेशी जातात. कोरोना प्रादुर्भावामुळे एरवी तेजीत असलेली फुलांची एकूणच निर्यात कमी झाली होती. त्यातही गुलाबाला काहीच मागणी नव्हती. त्यामुळे बहुसंख्य उत्पादन स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून होते, मात्र तिथेही मागणी कमीच होती. आता काही प्रमाणात विमानसेवा सुरू झाली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ तोंडावर आल्याने गुलाबाची मागणी सुरू झाली आहे. विमानांच्या कंटेनर बुकिंगसाठी निर्यातदार कंपन्यांना नेहमीपेक्षा जास्त दर द्यावा लागतो आहे. पूर्वी एक किलोला सव्वाशे रुपये खर्च होता, आता तो थेट सव्वातीनशे रुपयांवर गेला आहे. परदेशातील भावही कमी झाले आहेत. पूर्वी एक गुलाब परदेशात पंधरा रुपयांना विकला जायचा, यंदा ही किंमत बारा रुपयांवर आल्याचे निर्यातदार सांगतात.