शेतकऱ्याची जमीन नगसेवकाच्या घशात; पोलिसांनीच दिला बेकायदेशीर ताबा मिळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:14 PM2021-10-18T15:14:24+5:302021-10-18T15:15:00+5:30
खेड तालुक्यातील मरकळ येथे एका शेतकऱ्यांच्या ६४ गुंठे जमिनीचा ताबा स्थानिक पोलीस प्रशासनाने पिंपरीतील नगरसेवकाला बेकायदा मिळवून दिला
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील मरकळ येथे एका शेतकऱ्यांच्या ६४ गुंठे जमिनीचा ताबा स्थानिक पोलीस प्रशासनाने पिंपरीतील नगरसेवकाला बेकायदा मिळवून दिला. याप्रकरणी स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांने थेट मुंबई उच्च न्यायालयात पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्त व आळंदी पोलिसांविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. तसेच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी बुधवारपासून (दि.२०) मुंबईतील आझाद मैदानात कुटुंबासह आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने पत्रकार परिषदेत दिली.
मौजे मरकळ गावातील रमेश गोडसे यांच्या मालकी हक्क्याच्या गट नं २१५ मधून आळंदी - मरकळ रस्ता जात आहे. त्याचे महसूल पातळीवर विभाजन होऊन २१५ - १ व २१५ - २ असे भाग पडले आहेत. त्यानुसार २१५ - २ मध्ये गोडसे यांची जमीन व कंपनी असून सातबारावर तशी नोंद आहे. दरम्यान खोट्या चतुःसीमा दाखवून गोडसे सदरच्या जमिनीची विक्री झाली. पिंपरी - चिंचवडच्या एका नगरसेवकाने ही जमीन घेतली.
दरम्यान खेडच्या तहसीलदारांनी आळंदी पोलीस ठाण्याला २१५ - १ या क्षेत्राचा ताबा घेण्याबाबत पत्र दिले. मात्र १४ जून २०१८ रोजी संबंधित नगरसेवकाने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून २१५ - २ या क्षेत्रावर अतिक्रमण करून कंपनीभोवती कंपाऊंड उभारून बेकायदा ताबा मिळवला.
याबाबत रमेश गोडसे यांनी सांगितले, संबंधीत नगरसेवकाने वारंवार आम्हा परिवारास दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आम्ही दोन वर्षांपासून शासनदरबारी दाद मागत असून आम्हाला न्याय मिळत नसल्याने आम्ही आझाद मैदानात कुटुंबासह आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पोलीस महासंचालक आदींना निवेदनाद्वारे कळविले आहे.