महामंडळाला प्रवाशांची काळजी, पण फक्त कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:34+5:302021-02-21T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: एसटी महामंडळाच्या त्यांच्या बसमधून रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची काळजी आहे. मात्र नियोजन, कार्यक्षमता, तल्लखता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: एसटी महामंडळाच्या त्यांच्या बसमधून रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची काळजी आहे. मात्र नियोजन, कार्यक्षमता, तल्लखता याच्या अभावामुळे ही काळजी फक्त कागदावरच राहिली आहे. रोज काही लाख किलोमीटरची धाव करणाऱ्या महामंडळाच्या गाड्यांमध्ये सुरक्षेच्या साधनांची वाणवाच आहे.
पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर (आता वाकडेवाडी) व पुणे रेल्वे स्थानक अशी तीन आगारे आहेत. तिन्ही ठिकाणांहून राज्यभर गाड्या धावतात व राज्यातील अनेक ठिकाणांहून तिथे येतात. लाखो प्रवाशांची रोजची ये-जा आहे. त्यांच्या सुरक्षेची ना स्थानकांमध्ये व्यवस्था आहे ना गाड्यांमध्ये! नियम भरपूर, पालन मात्र कशाचेच नाही अशी अवस्था आहे.
कधीतरी वाहकांना आग प्रतिबंधक सिलिंडर वापरायचा कसा त्याचे प्रशिक्षण दिलेले आहे, तेच सांगण्यात येते. प्रथमोपचार पेट्याही दिल्या जातात म्हणून माहिती देण्यात येते. हे सगळे साहित्य गाडीत मात्र दिसत नाही. चालकाच्या केबिनमध्ये सिलिंडर असणे अपेक्षित आहे असे सांगण्यात येते, दिसत मात्र नाही. प्रथमोपचार पेटी आतील बाजूस दर्शनी भागावर किंवा वाहकाजवळ असावी. पण ती नसतेच. असली तर त्यातील साहित्य जुजबीच असते.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सिलिंडर दिसतो. त्यातही शिवनेरी किंवा एशियाडमध्ये तो आहे. लाल परी म्हणजे साध्या गाडीत मात्र अपवादानेच सिलिंडर आहे. तिन्ही स्थानकांमध्ये एकाही गाडीत प्रथमोपचार पेटी दिसली नाही. एकदोन वाहकांनी ती चालकाजवळच्या कपाटात ठेवली आहे असे सांगितले. त्यातील साहित्याविषयी मात्र त्यांना सांगता आले नाही. त्याचा वापर कसा करायचा हेही त्यांना माहिती नव्हते.