‘रिलायन्स जिओ’ कंपनीवर पालिकेची २३ कोटींची मेहरबानी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:45+5:302021-02-24T04:12:45+5:30
पुणे : पालिकेने रिलायन्स जिओ कंपनीला ७२ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परवानगी देत तब्बल २३ कोटी रुपयांची मेहरबानी दाखविली आहे. ...
पुणे : पालिकेने रिलायन्स जिओ कंपनीला ७२ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परवानगी देत तब्बल २३ कोटी रुपयांची मेहरबानी दाखविली आहे. सर्वसाधारण सभेच्या ठरावाला अनुसरुन परवानगी देणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे.
कंपनीने नोव्हेंबर २०२० मध्ये पालिकेला याबाबत साध्या कागदावर पत्र दिले. ७२ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परवानगी मागण्यात आली होती. पालिकेने मागितल्याप्रमाणे या रस्त्यांची यादी देण्यात आली. परंतु, या कंपनीने सलग खोदाई सुरु केली. पालिकेने कंपनीला खोदाईसाठी ‘रनिंग मीटर’मागे १० हजार १५५ रुपयांचा दर आकारणे आवश्यक होते. परंतु, मोफत परवानगी देण्यात आली. ज्या कंपनीची खोदाई आहे त्याच कंपनीला रस्ता पुन्हा व्यवस्थित करुन देण्याचे काम पहिल्यांदाच देण्यात आले आहे.
या गैरप्रकाराबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपले पितळ उघडे पडेल या भीतीने अधिकाऱ्यांनी कंपनीला सलग खोदाईचे कारण देत काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने रनिंग मीटरच्या गणितानुसार पालिकेकडे २० कोटी ३१ लाख रुपये भरणे आवश्यक होते. तसेच त्यावरील सरचार्जपोटी अडीच कोटी भरणे गरजेचे होते असे शिंदे म्हणाले. ही रक्कम वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.