पालिका पुन्हा भरणार सल्लागारांचा खिसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:31+5:302020-12-03T04:19:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थायी समितीने मागील आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकल्पासाठी सल्लागार न नेमण्याचा निर्णय घेतला होता. सल्लागार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थायी समितीने मागील आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकल्पासाठी सल्लागार न नेमण्याचा निर्णय घेतला होता. सल्लागार नेमूनही प्रकल्पांच्या अपयशामुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता पुन्हा नव्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून सल्लागारांचा खिसा पुन्हा एकदा भरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामधून काही ठराविक कंपन्यांचे ‘भले’ करण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.
शहरातील अनेक बडे प्रकल्प उभारताना सल्लागारांची नेमणूक करण्यात आली. या सल्लागारांनी दिलेल्या प्रकल्प अहवालानुसार हे प्रकल्प उभारण्यात आले. अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. तर, काही प्रकल्प सुरु होऊनही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. सल्लागारांवर केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळेच सल्लागार न नेमण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता.
परंतु, आता होर्डिंग उभारणे, उच्च क्षमता द्रुतगती वतुर्ळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्प आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याचे प्रशासनाने प्रस्ताव तयार केले आहेत. यावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.