स्वच्छतागृहांसाठी पालिकेला सिंगापूरच्या कंपनीचे साह्य
By admin | Published: October 2, 2016 05:46 AM2016-10-02T05:46:19+5:302016-10-02T05:46:19+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधून देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या महापालिकेने आता सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी
पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधून देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या महापालिकेने आता सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सिंगापूरमधील एका संस्थेचे साह्य घेतले आहे. त्यांच्या मदतीने शहरात आधुनिक स्वरूपाची सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.
वर्ल्ड टॉयलेट आॅर्गनायझेशन अशा नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या या संस्थेचे प्रमुख जॅक सीम यांना पालिकेने केलेल्या या विक्रमाची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी स्वत: पालिकेशी संपर्क साधला. जॅक हे जगभर टॉयलेट या क्षेत्रात काम करतात. जगातील अनेक देशांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. आजाराचे सर्वांत मोठे कारण नैसर्गिक विधींसाठी योग्य सुविधा नसतात, हेच असल्याचे त्यांनी सांगितले.
निरोगी राहायचे असेल, तर स्वच्छ शौचालये, स्वच्छतागृहे हेच सर्वांत स्वस्त औषध आहे, असे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते. पालिकेने महिलांसाठी मोबाईल टॉयलेट तयार केली आहेत. त्याचे उद््घाटन रविवारी सकाळी बालगंधर्व रंगमदिरात होणार आहे. त्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. सर्व सोयींनी उपयुक्त अशी स्वच्छतागृहे तयार करण्याबाबत जॅक यांची ख्याती आहे. ते या बाबतीत पालिकेला सहकार्य करणार आहेत, असे आयुक्त म्हणाले. सर्वाधिक दुर्लक्षित अशा या विषयाला महत्त्व देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (प्रतिनिधी)