पालिका उभारणार पाच हजार खाटांची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:44+5:302021-03-25T04:12:44+5:30
पुणे : सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी शहराच्या विविध भागात कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू केले जाणार आहेत. या ...
पुणे : सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी शहराच्या विविध भागात कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये पाच हजार खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली. आत्तापर्यंत तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली असून आणखी सेंटर सुरू केले जाणार असल्याचे मुठे यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत चालला आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर बंद करण्यात आलेले कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यास सुरवात करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार सरकारी व खासगी महाविद्यालयाच्या इमारतीतील कोविड केअर सेंटरही सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खराडी येथील रक्षकनगर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येरवडा व हडपसर येथे दोन सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. गंगाधाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीत दोनशे खाटांच्या क्षमतेचे कोविड सेंटर गुरुवारी सुरू केले जाणार आहे. सोमवारपासून येरवड्यातील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या इमारतीतील आणि बालेवाडी निकमार येथील तीनशे खाटांच्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.