गुंतवणूकदारांसाठी पालिका उभारणार स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:53+5:302021-02-16T04:13:53+5:30
पुणे : शहरात वेगवेगळ्या प्रकारची परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी पालिकेने ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) स्थापन करावा, अशी मागणी मराठा ...
पुणे : शहरात वेगवेगळ्या प्रकारची परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी पालिकेने ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) स्थापन करावा, अशी मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) केली. या मागणीचा सन्मान राखत अशा प्रकारचा कक्ष सुरू केला जाईल, अशी ग्वाही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या कार्यालयाला सोमवारी सभागृह नेते गणेश बिडकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी एमसीसीआयएच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबणे यावेळी उपस्थित होते. पालिकेच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. मात्र ही गुंतवणूक करताना अनेक अटींची पूर्तता करावी लागते. विविध प्रकारची कागदपत्रे, परवानगी घ्यावी लागते, हे करताना अनेक अडचणी येतात. गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी पालिकेने स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी एमसीसीआयएने केली.
महापालिकेच्या वतीने यासाठी विशेष कक्ष सुरू केला जाईल. ''किमान सरकार कमाल कारभार'' या तत्वावर हा कक्ष काम करेल. गुंतवणूकदारांच्या अडचणी, समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक असलेली मदत पालिकेच्या या विशेष कक्षाच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन बीडकर यांनी दिले.