पाणीटंचाईमुळे नगरसेवक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:00 AM2018-05-22T07:00:12+5:302018-05-22T07:00:12+5:30
भाजपाला मिळाला घरचाच आहेर, भामा-आसखेडचे पाणी पुढील वर्षीही मिळणार नाही
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घरचाच अहेर स्वीकारावा लागला. पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर टीका केली. भामा आसखेड धरणाचे पाणी पुढच्या वर्षी मेअखेरही मिळणार नसल्याचे या वेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.
सभेची विषयपत्रिका सुरू होण्यापूर्वी तातडीचे म्हणून बऱ्याच नगरसेवकांनी पाण्यासह अनेक समस्यांवरून प्रशासनावर टीका केली. १३ दिवसांनी पाणी मिळणारा भाग म्हणून लोहगाव व त्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्याबाबत खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनीच प्रशासनाला खुलासा करण्यास सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी हा कालावधी आता ५ दिवसांवर आणला आहे असे सांगितले. त्यावर या भागातील भाजपाचे नगरसेवक बापूराव कर्णे, अनिल टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी प्रशासनाला असे असेल तर आमच्याबरोबर चला व दाखवा, असे आव्हानच दिले. प्रशासन खोटी माहिती देत आहे असे ते म्हणाले.
त्यानंतर नंदा लोणकर, अॅड. गफूर पठाण, माजी महापौर दत्ता धनकवडे, बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर आदींनी त्यांच्या भागातील पाण्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. पाणी वेळेवर मिळत नाही, पुरेसे मिळत नाही, अनेकदा मिळतच नाही, मागवले तरी टँकर येत नाहीत, आले तरी पुरत नाही अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. येरवडा, कळस, धानोरी, लोहगाव या परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र भामा आसखेड पाणी योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत या भागाला नियमित पाणी मिळणार नाही व मे २०१९ पर्यंत तरी या योजनेतून पाणी उचलता येणार नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यावर चेतन तुपे यांनी असे असेल, तर मग २४ तास पाणी योजना तरी पूर्ण होणार आहे की नाही, अशी विचारणा केली. भाजपाचे अमोल बालवडकर यांनी प्रशासनाला आतापर्यंत ४० पेक्षा जास्त पत्रे पाठवली, त्यापैकी एकाचेही उत्तर देण्यात आले नाही असे सांगत प्रशासनाचे वाभाडे काढले. अधिकारी नीट उत्तरे देत नाही, सदस्यांनाच माहिती देण्यास सांगतात अशी तक्रार त्यांनी केले. शिवसेनेच्या संजय भोसले यांनी सत्ताधारी नगरसेवकांची अवस्था अशी असेल, तर मग नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भय्या जाधव यांनी दप्तर दिरंगाईचा कायदाच वाचून दाखवत ७ दिवसांच्या आत फाईल किंवा नगरसेवकांच्या पत्रावर कार्यवाही केली नाही, तर या कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, असे सांगितले. आपण स्वत:ही १०० पेक्षा जास्त पत्र पाठवली असून, अपवाद वगळता बहुसंख्य पत्रांची दखल घेण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. महापौर टिळक यांनी यावर प्रशासनाला खुलासा करण्याचा आदेश दिला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबत आपण सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सूचना देऊ, असे सांगितले. यासंदर्भात एक सुयोग्य पद्धत तयार करून तिचा अवलंब करण्यात येईल, पक्षनेत्यांनाही त्याची माहिती देऊ, यापुढे सर्वच नगरसेवकांच्या पत्रांना विभागप्रमुखांकडून उत्तरे दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
योग्य नियोजन नाही : अन्यथा उपलब्ध पाणीही पुरेसे
भाजपाच्या अमोल बालवडकर यांनी प्रशासन असे वागत असेल, तर यापुढे सभागृहात मतदानात भाग घ्यायचा की नाही, याबाबत विचार करू, असा इशाराच भर सभागृहात दिला. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजवून बालवडकर यांना दाद दिली व भाजपाचा प्रशासनावर अंकुश नाही, अशी टीका केली. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते, त्यामुळे पाणी कमी पडते असे नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तुमच्याकडे योग्य नियोजन नाही; अन्यथा आहे ते पाणीही सर्व भागाला नियमित मिळू शकते, असा दावा कर्णे यांनी केला. भाजपाच्या वर्षा तापकीर यांनी तळजाई, धनकवडी या भागाला पुरेसे पाणी मिळत नसल्याबद्दल प्रशासनाला दोष दिला व यात सुधारणा करावी, अशी मागणी केली. अखेर महापौर टिळक यांनी हस्तक्षेप करत या विषयावरील चर्चा थांबवली.