‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

By admin | Published: July 21, 2015 03:18 AM2015-07-21T03:18:56+5:302015-07-21T09:11:08+5:30

शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या

Corporators' commentary on 'Smart City' | ‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

Next

पुणे : शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र नगरसेवक, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सूचनांमधून पुढे आले. या ३ गोष्टींवर पालिकेने व्यवस्थित काम केले, तर पुणे शहर आपोआपच स्मार्ट सिटी होईल,असे मत या सर्वांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी व अमृत अभियान योजनेची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने यशदा येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे तसेच स्मार्ट सिटी योजनेचे दिल्ली येथील तांत्रिक अधिकारी मेहताब या वेळी व्यासपीठावर होते. बहुसंख्य नगरसेवकांनी या वेळी शहर स्मार्ट होण्यासाठी महापालिकेने कचरा, सार्वजनिक वाहतूक व पाण्याचा पुनर्वापर याव्ांर नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांबरोबरच मनपा अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनीही शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर टीका करून तीत सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या, तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या काही योजनांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल, त्यासाठीच्या अटी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला काय करावे लागेल, याविषयी त्यांनी सांगितले. त्यानंतर या योजनेचे केंद्रातील अधिकारी मेहताब यांनी स्मार्ट सिटी व अमृत योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी देशातून फक्त १०० शहरांची निवड करण्यात येणार असून, त्यांत महाराष्ट्रातील १० शहरे आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय याबरोबरच केंद्र सरकारच्या या योजनेतून कशा प्रकारची मदत मिळेल, त्यासाठी कोणत्या अटी व नियम आहेत, याबाबत मेहताब यांनी सांगितले.
पुणे शहर स्मार्ट होतेच; मात्र लोकसंख्यावाढीला अनुसरून नागरी सुविधा देण्यात मनपाला अपयश आल्यामुळेच ते आता बकाल होत चालले आहे, अशी टीका विशाल तांबे, अविनाश बागवे यांनी केली. वनिता वागस्कर यांनी विकास आराखड्याचे काय झाले, त्यातील अनेक गोष्टी स्मार्ट सिटी योजनेत घेता येतील, असे सुचवले. स्मार्ट शहरातील वाहतूकही स्मार्ट हवी, त्यासाठी काय उपाय करणार ते सांगा, अशी मागणी पुष्पा कनोजिया यांनी केली. माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्यांचा रंग बदलला तरी शहर स्मार्ट दिसेल, अशी टीका केली.
माधुरी सहस्रबुद्धे, मीनल सरोदे, कैलास गायकवाड, विकास दागंट, किशोर शिंदे आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला व विविध सूचना केल्या. गटनेते गणेश बिडकर, बाबू वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे यांनीही मत व्यक्त केले. उपमहापौर आबा बागुल यांनी केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत पुणे शहराचा समावेश झाला पाहिजेत, अशा पद्धतीने आपली प्रवेशिका प्रशासनाने दाखल करावी, अशी सूचना केली. म्महापौर धनकवडे यांनी कार्यशाळेचा समारोप केला. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Corporators' commentary on 'Smart City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.