नगरसेवकांनी धरले आयुक्तांना धारेवर
By admin | Published: October 20, 2015 03:15 AM2015-10-20T03:15:01+5:302015-10-20T03:15:01+5:30
आर्थिक स्थितीचे कारण दाखवून विकासकामांमध्ये कपात करण्याच्या आयुक्तांच्या परिपत्रकावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना धारेवर धरले. विकासकामांना कसलीही
पुणे : आर्थिक स्थितीचे कारण दाखवून विकासकामांमध्ये कपात करण्याच्या आयुक्तांच्या परिपत्रकावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना धारेवर धरले. विकासकामांना कसलीही कात्री लागणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतरच आयुक्तांची सुटका झाली. सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र आले असताना महापौर दत्तात्रय धनकवडे मात्र सभेत एकाकी पडले होते.
विकासकामांतील कपातीचा विषय सुरू झाल्यावर सुरुवातीला सौम्यपणे बोलत असलेल्या नगरसेवकांना सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोखले यांनी या संदर्भात व्यक्त केलेल्या तीव्र मतांमुळे जोर आला. गोखले यांनी ५ कोटींची कामे असतील तरीही ५ टक्के कपात व ५ लाखांची असतील तरीही ५ टक्केच कपात हा काय प्रकार आहे, असा प्रश्न विचारून थेट महापौर व आयुक्तांवरच तोफ डागली. त्यानंतर मनसेचे राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, बाळासाहेब शेडगे, अस्मिता शिंदे, रूपाली पाटील-ठोंबरे, भाजपाचे गणेश बीडकर, वर्षा तापकीर, मनीषा घाटे आदींनी आयुक्त कुणाल कुमार कोणत्या अधिकारात कपात करीत आहेत, असा सवाल केला. सर्वच नगरसेवकांनी या विषयावर आरडाओरडा सुरू केला.
महापौर असे कोंडीत सापडलेले असताना सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक सुभाष जगताप हे दोघे वगळता राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे कोणीही नगरसेवक त्यांना मदत करीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी आयुक्तांना खुलासा करण्यास सांगितले. ते परिपत्रक म्हणजे उत्पन्न आढावा बैठकीचे इतिवृत्त होते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठक झाली त्या वेळी मागील वर्षाच्या तुलनेत २५० कोटी रुपये जादा खर्च झाला असल्याचे व उत्पन्नात मात्र घट असल्याचे दिसत होते. त्यामुळे तो उपाय पुढे आला. मात्र, विकासकामांत अशी कोणताही कपात करण्याचा विचार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्थायी समितीने मान्यता दिलेले वर्गीकरणाचे (एखाद्या विषयासाठीची तरतूद दुसऱ्या विषयावर खर्च करणे) काही कोटी रुपयांचे प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आले. एकीकडे स्थायी समितीची सभा सुरू होती व दुसरीकडे त्या सभेत असलेले विषय लगेचच सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आणले गेले. यावर मनसेचे वागस्कर, शिंदे यांनी आक्षेप घेतला. केमसे यांच्या विनंतीनंतर हे सर्व विषय मंजूर करण्यात आले. आयत्या वेळचे म्हणून दाखल झालेल्या विषयांनाही चर्चेअंती मान्यता देण्यात आली. राजू पवार, सचिन भगत, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नंदा लोणकर, योगेश गोगावले, दिलीप बोराटे आदींनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)