शिवसृष्टी उभारणीसाठी आयुक्तांना नगरसेवकांचे पत्र
By Admin | Published: December 24, 2016 12:42 AM2016-12-24T00:42:00+5:302016-12-24T00:42:00+5:30
कोथरूड येथे नियोजित मेट्रो स्थानकाच्या शेजारीच शिवसृष्टीही करावी, अशी सूचना व मेट्रोच्या कितीतरी आधी या प्रकल्पाचा
पुणे : कोथरूड येथे नियोजित मेट्रो स्थानकाच्या शेजारीच शिवसृष्टीही करावी, अशी सूचना व मेट्रोच्या कितीतरी आधी या प्रकल्पाचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, अशी विचारणा करणारे पत्र कोथरूडमधील नगरसेवकांच्या वतीने आयुक्त कुणाल कुमार व महापौर प्रशांत जगताप यांना शुक्रवारी देण्यात आले.
कोथरूड येथील २८ एकर जागेवर शिवसृष्टी करावी, अशी मागणी नगरसेवक दीपक मानकर यांनी ५ वर्षांपूर्वी केली होती. त्याला कोथरूडमधील सर्व नगरसेवकांनी प्रतिसाद दिला. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली. मात्र, त्यानंतरच त्याच जागेवर नियोजित मेट्रोचे स्थानक
उभे राहणार असे निश्चित झाले व
शिवसृष्टी प्रकल्प नंतर केवळ चर्चेतच राहिला. मानकर तसेच अप्पा रेणुसे, किशोर शिंदे, पृथ्वीराज सुतार या नगरसेवकांकडून त्याचा वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता; मात्र प्रशासन काहीच हालचाल करायला तयार नव्हते.
आता तर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे व शिवसृष्टीचे नावही ऐकायला यायला तयार नाही. त्यामुळे मानकर, रेणुसे, शिंदे आदींनी आयुक्त व महापौर यांना पत्र दिले. त्यात त्यांनी एकूण जागा २८ एकर आहे. मेट्रो स्थानकाला १० एकरपेक्षा जास्त जागा लागणार नाही. त्यामुळे उर्वरित १८ एकर जागेवर शिवसृष्टीचे काम करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. मेट्रोला विरोध नाही; मात्र शिवसृष्टीही व्हायला हवी. त्यासाठी अंदाजपत्रकातील तरतूद दरवर्षी दुसरीकडे वळविली जात आहे, हे काही योग्य नाही, याचा विचार करावा, असे पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)