नगरसेवकांना झोंबले परिवर्तन ‘प्रगतिपुस्तक’
By admin | Published: July 26, 2016 05:28 AM2016-07-26T05:28:17+5:302016-07-26T05:28:17+5:30
‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या नगरसेवकांच्या कामांच्या अहवालावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत सोमवारी गदारोळ केला. संस्थेने तयार केलेला अहवाल
पुणे : ‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या नगरसेवकांच्या कामांच्या अहवालावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत सोमवारी गदारोळ केला. संस्थेने तयार केलेला अहवाल चुकीचा असून, ही माहिती नगरसचिव कार्यालयाकडून दिली गेल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ही संस्था आप या राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्यातूनच नगरसेवकांना बदनाम करण्याची मोहीम ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली असल्याची टीका नगरसेवकांनी केली.
काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांना मनसेच्या असल्याचे दाखविण्यात आले. त्यांच्यावर कसलाही गुन्हा नसताना गुन्हा आहे, असे दर्शविण्यात आले आहे. संपूर्ण अहवालात अशी चुकीची माहिती जागोजागी आहे. ही सर्व माहिती नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आली असल्याचे संस्था सांगत आहे. ’’
राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर म्हणाल्या, ‘‘न बोलणाऱ्या महिला नगरसेवकांमध्ये माझा समावेश केला गेला आहे. आम्ही लेखी प्रश्न विचारले, तर त्याची माहिती मिळते, त्यामुळे तोंडी प्रश्न विचारले जात नाही. मात्र, संस्थेला पालिकेच्या कामकाजाची माहिती दिसत नाही.’’ मनसेच्या अस्मिता शिंदे, वनिता वागस्कर यांनीही संस्थेवर अयोग्य माहिती प्रसिद्ध केली असल्याची टीका केली. काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी संस्थेचा सर्व अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी वर्तमानपत्रातील बातम्यांवर सभागृहात चर्चा करता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित केला, मात्र सर्व नगरसेवकांनी त्याला विरोध केला. अरविंद शिंदे यांनी आम्ही त्यावर बोलत नाही, तर नगरसचिवांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवर बोलत आहोत, असे सांगितले. त्यानंतर सर्वांचाच रोख नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे वळाला. महापौर प्रशांत जगताप यांनी त्यांना खुलासा करण्यास सांगितले.
पारखी यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत आपले कार्यालय माहिती देत असते. या संस्थेला अशी कोणतीही माहिती दिली असल्याची नोंद नाही. काही जण वैयक्तिक स्तरावर माहिती विचारत असतात. त्यांना दिलेल्या प्रत्येक माहितीची नोंद कार्यालयात आहे. त्यात या माहितीचा समावेश नाही. त्यांचा खुलासा सुरू असतानाच शिंदे यांनी त्यांच्यावर तुम्हीच माहिती दिली, असा आरोप केला. असे असेल तर कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे पारखी म्हणाले. त्यानंतर महापौर जगताप यांनी हस्तक्षेप करीत ही चर्चा थांबविली. (प्रतिनिधी)
मनसेच्या रूपाली पाटील यांनी ‘आपण सभागृहात काहीही बोलत नाही,’ हे यातून कळाले व चक्करच आली, असे सांगितले. आपल्या बाबतीत सभागृहात असे कोणीही म्हणणार नाही, असे त्या म्हणाल्यावर नेहमी मोठ्या आवाजात बोलण्याची त्यांची सवय लक्षात घेऊ’न महापौर जगताप यांनी त्यावर ‘हे मात्र खरे आहे,’ अशी टिप्पणी केली.