नगरसेवक पुत्राला गुन्हे शाखेकडून अटक

By admin | Published: May 10, 2014 07:41 PM2014-05-10T19:41:36+5:302014-05-10T20:35:07+5:30

५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक ४६ अ चे नगरसेवक सतीश लोंढे यांच्या मुलासह तीन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

Corporator's son arrested from crime branch | नगरसेवक पुत्राला गुन्हे शाखेकडून अटक

नगरसेवक पुत्राला गुन्हे शाखेकडून अटक

Next

पुणे : भंगार व्यावसायिकाला कुख्यात गजा मारणेच्या नावाने फोन करुन ५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक ४६ अ चे नगरसेवक सतीश लोंढे यांच्या मुलासह तीन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश असून सापडलेल्या मोबाईलमधील सीमकार्डवरुन धमकीसाठी फोन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
खंडू सतीश लोंढे (वय ३२, रा. पुलाखाली, वैदुवाडी, हडपसर), सोमनाथ शिवाजी शिंदे (वय २३, रा. रामटेकडी, हडपसर), संजय मल्हार डिखळे (वय ४९, रा. आझादनगर, वानवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर खंडू हा नगरसेवक सतीश लोंढे यांचा मुलगा आहे. खंडूची आईही यापुर्वी नगरसेविका होती. याप्रकरणी रविवार पेठेत राहणा-या भंगाराच्या व्यापा-याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील सोमनाथवर खून आणि वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू आणि फिर्यादी व्यापारी काही महिन्यांपुर्वी एकत्र भंगाराचा व्यवसाय करायचे. त्यांचे अनेक व्यवहार एकत्रच व्हायचे. परंतु काही दिवसांनंतर खंडू हा धंद्यामध्ये फसवणूक करु लागला. त्यामुळे या व्यापा-याने त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांच्यामध्ये वितुष्ट आले.
त्याच्या रागातूनच खंडू याने आरोपी सोमनाथ याला सोबत घेऊन व्यापा-याला धमकी देऊन पैसे उकळण्याचा कट आखला. त्यानुसार सोमनाथ, संजय आणि खंडू यांनी एकत्र बसून या व्यापा-याला फोन केला. आपण गजानन मारणे बोलत असून ५ लाखांची खंडणी देण्याची मागणी केली. नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक मारुती भुजबळ, पोलीस कर्मचारी संजय काळोखे, गणेश माळी, ॠषी महाले, प्रशांत पवार, बोराडे, दळवी आणि देसाई यांनी दिवसभरात आरोपींचा माग काढून त्यांना शनिवारी दुपारी अटक केली.

ज्या सीमकार्डचा वापर करुन या व्यापा-याला फोन करण्यात आला. ते सीमकार्ड रामटेकडीमधील काही मुलांनी मुंबईमधून मोबाईल चोरट्याकडून विकत घेतले होते. एकाकडून दुस-याकडे, दुस-याकडून तिस-याकडे असे हे सीमकार्ड खंडू पर्यंत आले. त्याने ते सोमनाथला दिले. त्यावरुन सोमनाथ व डिखळे यांनी फोन केला. सोमनाथ याने या व्यापा-याला फोन करुन त्याचे नाव विचारल्यावर 'महाराजांशी बोला' असे म्हणून फोन डिखळेकडे दिला. डिखळे याने ' मी गजानन मारणे बोलतोय. माझी पोरं सोडवायची आहेत, मला 5 लाख हवेत. नाहीतर गोळ्या घालीन.' अशी धमकी दिली.

गजा मारणेच्या नावानेच थेट खंडणीचा फोन आल्यामुळे पोलीसही सतर्क झाले होते. उपलब्ध मोबाईल क्रमांकावरुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून गजा मारणेचीही चौकशी करण्यात आली. मारणेला गुन्हे शाखेमध्ये बोलावून जबाब घेण्यात आला आहे. परंतु या प्रकरणामध्ये त्याचा काही संबंध नसल्याचेही पोलीसांनी स्पष्ट केले.

Web Title: Corporator's son arrested from crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.