श्रेय लाटण्यासाठीच नगरसेवकाची ‘स्टंटबाजी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:45+5:302021-03-10T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचे सांगत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचे सांगत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर झोपून आंदोलन केले. हे आंदोलन केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात आले. आता काम पूर्णत्वास आल्याची माहिती झाल्यानंतर चितेवर झोपून जाधव ‘स्टंटबाजी’ करत असल्याचा आरोप खराडीतील काही नागरिकांनी केला आहे.
जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर दोन दिवसांनी लगेच त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काम पूर्ण होत आल्याची माहिती जाधव यांना होती. गेल्या १० वर्षांपासून सुस्थितीत असलेल्या स्मशानभूमीचे नूतनीकरण का करण्यात येत आहे, बजेट मिळणार नव्हते तर नूतनीकरणाचा घाट का घातला, नगरसेवक म्हणून दरवर्षी मिळणाऱ्या अडीच कोटींच्या निधीचे काय झाले, स्वतःच्या वाॅर्डस्तरीय योजनेतून या कामासाठी पैसे का टाकले नाहीत, असे अनेक प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहेत.
नगरसेवक जाधव यांनी मिळालेला विकास निधी स्मशानभूमीसाठी खर्च केला असता तर चितेवर झोपण्याची स्टंटबाजी त्यांना करावी लागली नसती. गेल्या चार वर्षांत किती निधी कुठे खर्च केला, प्रभागात कुठे, कोणती कामे सुरू आहेत, त्यासाठी किती निधी मंजूर आहे याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच नागरिकांना रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असा आरोप स्थानिक करत आहेत.
कोट
“खर्चाची माहिती आयुक्तांना विचारावी. आंदोलन केले म्हणून तरी तत्काळ तीन ब्लॉक सुरू झाले. स्मशानभूमीला आधी पत्र्याचे छत होते. अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना त्रास होऊ नये यासाठी नूतनीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते, त्यावेळी विरोधक कुठे होते. त्यांनी चितेवर झोपून आंदोलन करून दाखवावे.”
-भैयासाहेब जाधव, नगरसेवक