नगरसेवकांची आज झाडाझडती?
By admin | Published: October 2, 2015 01:12 AM2015-10-02T01:12:01+5:302015-10-02T01:12:01+5:30
सरकार नियुक्त समितीने केलेल्या शहर विकास आराखड्यावर पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेली बोटचेपी भूमिका व हिराबाग; तसेच
पुणे : सरकार नियुक्त समितीने केलेल्या शहर विकास आराखड्यावर पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेली बोटचेपी भूमिका व हिराबाग; तसेच श्रावणधारा भूखंडाबाबत झालेले कामकाज, यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असून, या संदर्भात त्यांनी सर्व नगरसेवकांची शुक्रवारी दुपारी गोखलेनगर येथील बारामती होस्टेलवर बैठक बोलाविली आहे. यात नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह स्थायी समिती सभापती अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे हे पदाधिकारी व सर्व नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. पक्षाच्या पालिकेतील कामकाजाची माहिती घेण्यासाठी बैठक बोलाविली. मात्र, काही विषयांवरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत पवार नाराज असून, त्यासाठीच त्यांनी ही बैठक बोलाविली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर काही पदांच्या खांदेपालटाबाबतही शक्यता अजमावून पाहणार असल्याचे समजते.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. महापालिकेने तयार केलेल्या पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर तो मुदतीत पूर्ण केला नाही म्हणून भाजपाप्रणीत राज्य सरकारने काढून घेतला. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.
या समितीने हा आराखडा पूर्ण करून, नुकताच तो सरकारला सादर केला. त्यावर महापालिकेच्या बुधवारी (दि.३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत बराच गदारोळ झाला. त्यात काँग्रेसने अतिशय आक्रमक भूमिका घेतली. तुलनेत सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र शांत होते.
पक्षाच्या महापालिकेतील कामकाजाबाबत पवार बरेच संवेदनशील आहेत. त्याआधीच त्यांनी महापौरांकडे खासगीत शहर विकास आराखडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी विचारणा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच सर्व नगरसेवकांना बैठकीचे सांगण्यात आले. उद्या दुपारी बारामती होस्टेलवर ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)