भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

By राजू इनामदार | Updated: January 10, 2025 16:26 IST2025-01-10T16:25:51+5:302025-01-10T16:26:26+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली

Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement | भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

पुणे: उद्धवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी तिथे आपल्याला उमेदवारी मिळेल का याची काळजी करावी, फुकटची मते व्यक्त करू नयेत असा संताप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केला. भाजपत गेलेल्या या ५ माजी नगरसेवकांनी पत्रकारांबरोबर बोलताना खऱी शिवसेना ठाकरेंचीच असे वक्तव्य केले होते. त्यावरून मंत्री सामंत यांचा पारा चढला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याकडे आलेल्या या ५ नगरसेवकांना समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विश्व मराठी भाषा संमेलनाच्या नियोजनसाठी म्हणून सामंत पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या ५ माजी नगरसेवकांचा समाचार घेतला. ते तिकडे गेले त्याविषयी काही म्हणायचे नाही, मात्र जाताना त्यांनी विनाकारण खरी शिवसेना ठाकरेंचीच असे मत व्यक्त केले. असे बोलण्याचा त्यांचा संबध काय? ज्या पक्षात ते गेले आहेत तिथे उमेदवारी मिळेल का याची काळजी त्यांनी करायला हवी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली.

दरम्यान शिंदेसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही त्या ५ जणांच्या या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ५ ही जणांवर टीका केली. शहर उपप्रमुख सुधीर कुरूमकर यांनी सांगितले की खरी शिवसेना कोणती हे सांगण्यासाठी या ५ जणांच्या दाखल्याची कोणालाच गरज नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्या शिवसेनेला भरघोस मतदान करून खरी शिवसेना कोणाची हा निकाल आधीच दिला आहे. अभिजित बोराटे यांनी सांगितले की त्या ५ जणांचा भाजप प्रवेश सत्तेच्या मोहापोटी झालेला आहे. भाजप व आमची युती आहे. त्यामुळे त्या ५ जणांचे तोंड बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक भाजप नेत्यांची आहे. त्यांनी ते केले नाही तर त्यांचे तोंड आम्ही बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशाल सरोदे, प्रदीप धिवार व अन्य पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Web Title: Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.