भ्रष्ट लोकांना लष्करात थारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:14+5:302021-05-28T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्करात भ्रष्ट लोकांना स्थान नाही. लष्करातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यात येत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लष्करात भ्रष्ट लोकांना स्थान नाही. लष्करातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लष्कर भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिसांना फेब्रुवारी महिन्यात माहिती देऊन यातील आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात लष्कर पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. येत्या काळात लष्कर भरती प्रक्रिया आणखी पारदर्शक बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सांगितले.
लष्कराच्या जनरल ड्यूटी भरती प्रक्रियेचा प्रश्नपत्रिका संच लष्करातील काहींनी फोडला होता. उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना लष्करात भरती करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, या प्रकरणाची आम्हाला आधीच महिती मिळाल्याने २८ फेब्रुवारीला याची माहिती पोलिसांना देत आम्ही या भ्रष्टाचारला आम्ही वाचा फोडली होती. भारतीय लष्कराला एक मान आहे, प्रतिष्ठा आहे. ही प्रतिमा जपण्यासाठी लष्करातील या भ्रष्ट प्रवृत्तींना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. भविष्यात या प्रकरणात पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य राहील.
भारतीय लष्करात भरती होण्याची देशातील तरुणांची अतिव इच्छा असते. यामुळे त्या या प्रकारच्या प्रवृत्तींना ते बळी पडू नये यासाठी, भरतीप्रकिया अधिक पारदर्शी बनण्याचा आमचा मानस आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही कठोर पावले उचलली आहेत.
दक्षिण मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लष्करी ठाण्यांना या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी भविष्यात असल्या प्रवृत्तींना बळी पडू नये, असे आवाहन जनरल नैन यांनी करत ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.