सुधारगृहात तोडफोड; ३८ महिलांचे पलायन
By Admin | Published: December 9, 2015 12:29 AM2015-12-09T00:29:08+5:302015-12-09T07:41:36+5:30
महमंदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन या महिला सुधारगृहात राहणाऱ्या ३८ महिलांनी तोडफोड करून पलायन केले़ ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली़
हडपसर : महमंदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन या महिला सुधारगृहात राहणाऱ्या ३८ महिलांनी तोडफोड करून पलायन केले़ ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली़
याबाबतची माहिती अशी : वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम ही संस्था करते़ या संस्थेच्या सुधारगृहात सध्या ५६ महिला आहेत़ या संस्थेतून सोमवारी ९ महिला पळून गेल्या होत्या़ त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे़
मंगळवारी रात्री महिलांनी संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करून तेथील कॉम्प्युटर फोडला़ टेबलखुर्च्यांची तोडफोड केली़ कार्यालयालगतच्या खोलीतील साहित्याची तोडफोड केली़
त्यानंतर ३८ महिला पळून गेल्या़ ही माहिती मिळताच वानवडी,
हडपसर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली़ त्यात ८ महिला पुलगेट येथे सापडल्या असून, हडपसरमध्ये आणखी १० महिलांना पकडण्यात आले आहे़
या महिलांपैकी काही जणी ३ वर्षांपासून या संस्थेत आहेत. काही जणींना त्यांच्या नातेवाइकांकडे सोपविण्याची आॅर्डर आली असतानाही सोडण्यात येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे़
याप्रकरणी रेस्क्यू फाउंडेशनच्या सुपरिंटेंड शायनी पडियार
म्हणाल्या, ‘‘काही तरी जळण्याचा
वास आला, म्हणून येथे
असणाऱ्या मावशी मुलींच्या खोलीत गेल्या़ त्यांना ढकलून त्या महिला बाहेर पडल्या़ त्यांनी कॉटचे पाईप काढून तोडफोड केली़ सुरक्षारक्षकाला ढकलून देऊन त्या पळून गेल्या़’’ (प्रतिनिधी)