राज्यात ‘अनलॉक’मध्ये लाचखोर फोफावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:35 AM2020-08-07T05:35:11+5:302020-08-07T05:35:51+5:30
लॉकडाऊनच्या तुलनेत तिप्पट वाढल्या तक्रारी
विवेक भुसे
पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये बहुतांश शासकीय कार्यालये बंद असल्याने लाचखोर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना संधी मिळत नव्हती. पण आता ‘अनलॉक’मध्ये शासकीय कार्यालये हळूहळू सुरु होऊ लागल्याने लाचखोर अधिकारी-कर्मचारी पुन्हा सक्रीय झाले आहेत. परिणामी एप्रिल-मेमध्ये लाचखोरीच्या जितक्या तक्रारी नोंदल्या गेल्या त्याच्या तिप्पट तक्रारी जुन-जुलैत नोंदल्या गेल्या.
एप्रिलमध्ये कडक लॉकडाऊन असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ आरोपी पकडले. मेमध्ये ३० तक्रारी आल्या आणि४३ आरोपी पकडले. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या एप्रिल-मेमध्ये लाचखोरीचे प्रमाण अनुक्रमे ८८ व ६१ टक्के कमी होते.
१ जानेवारी ते ४ आॅगस्टपर्यंतचा सरकारी भ्रष्टाचार
जूनपासून अनलॉक सुरु झाले. त्यामुळे गेली दोन महिने रखडलेली कामे करुन घेण्यासाठी नागरिक शासकीय कार्यालयात येऊ लागले आहेत. त्याबरोबरच लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हावरटपणा सुरु झाला. त्यांच्या विरोधात तक्रारी सुरु झाल्या आहेत.
परिणामी जूनमध्ये राज्यभरात
तब्बल ६४ सापळे यशस्वी झाले असून ८७ लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात आले. जुलैमध्ये ५६ सापळ््यांमध्ये ८१ सरकारी बाबूंना पकडण्यात आले.
परिक्षेत्र गुन्हे आरोपी
मुंबई १२ १९
ठाणे २६ ४१
पुणे ९३ १३७
नाशिक ५३ ६९
नागपूर ६१ १०६
अमरावती ५३ १२५
औरंगाबाद ४९ ७२
नांदेड ३९ ५५
एकूण ३८५ ६२४