कॉसमॉस बॅक फसवणूक: पोलिसांकडून सुरक्षा आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 05:42 AM2018-08-21T05:42:52+5:302018-08-21T05:43:15+5:30
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा आॅडिट केले जात आहे.
पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा आॅडिट केले जात आहे. पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा आॅडिट करण्यात येणार असून त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून व्हिसा तर देशातील अनेक शहरांमधून क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत विविध खात्यांमधून पंधरा हजारांहून अधिक व्यवहारांद्वारे सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात रुपे कार्डमार्फत देशातील ४१ शहरांमधून ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून अडीच कोटी रुपये काढले गेले आहेत़
ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले, देशातील ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले़ त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु असून त्यापैकी निम्म्या एटीएमचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे़ महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील एटीएममधून पैसे काढण्याचे समोर आले आहे. सर्वाधिक पैसे कोल्हापूर व मुंबई येथून काढण्यात आले आहेत. आता त्यात दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष खातेदारच आहे की दुसरी आहे, याची खातरजमा करण्याचे काम सुरु आहे़ परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली आहे़