कॉसमॉस बँकेचे एटीएम 2 दिवस राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 02:40 PM2018-08-14T14:40:34+5:302018-08-14T14:45:41+5:30
काॅसमाॅस बॅंकेच्या डेबीट कार्ड माध्यामातून हाेणाऱ्या पेमेंट सिस्टीमवर मॅलवेअरचा हल्ला झाल्याने पुढील दाेन दिवस काॅसमाॅस बॅंकेचे एटीएम सेंटरस बंद राहणार अाहेत.
पुणे : काॅसमाॅस बॅंकेच्या डेबीट कार्ड माध्यामातून हाेणाऱ्या पेमेंट सिस्टीमवर मॅलवेअरचा हल्ला झाल्याने पुढील दाेन दिवस काॅसमाॅस बॅंकेचे एटीएम सेंटरस बंद राहणार अाहेत. मॅलवेअरचा हल्ला हा बॅंकेच्या सीबीएस प्रणालीवर झाला नसल्याने खातेदारांच्या काेणत्याही खात्यावर त्याचा काेणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे बॅंकेकडून निवेदनाद्वारे सांगण्यात अाले अाहे. तसेच संशयास्पद व्यवहारांची रक्कम बॅंकेच्या काेणत्याही खातेदारांच्या खात्यातून काढली गेलेली नाही व जाणारही नाही. खातेदारांच्या मुदत ठेव, बचत व रिकरींग खात्यांतील रकमा सुरक्षित असल्याने खातेदारांनी घाबरुन जाऊ नये असे अावाहनही बॅंकेकडून करण्यात अाले अाहे.
गणेशखिंड राेडवरील काॅसमाॅस बॅंकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाल्याचे समाेर अाले अाहे. हॅकरने जवळपास 15 हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हिसा अाणि रुपे कार्डद्वारे तब्बल 94 काेटी 42 लाख रुपये हाॅंगकाॅंगला वळते केले अाहेत. या सर्व प्रकारामुळे बॅंक क्षेत्रात एकच खळबळ उडाली अाहे. हा प्रकार 11 ऑगस्टला दुपारी 3 ते रात्री 10 आणि 13 ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला. 11 ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह 24 देशातून केवळ 2 तासात 80 कोटी रुपये काढले गेले. तर 13 ऑगस्टला दुपारी 13 कोटी 92 लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले.
हल्ला करणाऱ्यांनी बॅंकेचा प्राॅक्सी स्विच उभा करुन त्या अाधारे सर्व व्यवहार क्लिअर करण्यास सुरुवात केली. याद्वारे साधारण 78 काेटीची रक्कम 28 देशांमधून अनेक एटीएम मधून काढली गेल्याचे निष्पन्न झाले अाहे. या अंतर्गत व्हिसाच्या सुमारे 12 हजार व्यवहारांची नाेंद झाली. तसेच भारतामध्ये विविध एटीएम्स मधून सुमारे 2.50 काेटीची रक्कम रुपे डेबीट कार्डसच्या अाधारे काढली गेली अाहे. यामध्ये सुमारे 2800 व्यवहारांची नाेंद झाली अाहे. या व्यवहारांबाबात तसेच एकूण रकमेबाबत तपास चालू असून या तपासाअंती प्रत्यक्ष किती रकमेचा संशास्पद व्यवहार झाला अाहे हे समजू शकणार अाहे. या प्रकरणी पडताळणी करण्याकरीता बॅंकेने प्राेफेशनल फाॅरेंसिक इनवेस्टिगेशन एजन्सी ला पाचारण केले असून याबाबत नक्की कशाप्रकारचा मालवेअर हल्ला अाहे हे पुढील काही दिवसात निष्पन्न हाेणार अाहे.