काॅसमॉस बँकेचे संचालक मुकुंद अभ्यंकर यांना शिक्षा, कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:18 PM2023-05-29T22:18:57+5:302023-05-29T22:19:56+5:30
Mukund Abhyankar : भरधाव कार चालवित दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन तिच्या डोक्यावरुन कारचे चाक घालून तिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर यास न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पुणे - भरधाव कार चालवित दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन तिच्या डोक्यावरुन कारचे चाक घालून तिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (वय ८६, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यास न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. दुगांवकर यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद आहे.
अरुंधती गिरीश हसबनीस (वय ३० रा. नर्हे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विक्रम सुशील धूत ( वय ३५, रा. शिवाजीनगर ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा अपघात भांडारकर रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर १७ जुलै २०१६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास झाला होता. अरुंधती या गुडलक चौकाकडे जात असताना तिला मुकुंद अभ्यंकर चालवत असलेल्या कारची विरुद्ध दिशेने धडक बसली त्यामध्ये तिचा जागेवरच अपघाती मृत्यू झाला. मुकुंद अभ्यंकर हे बेजबाबदारपणे गाडी चालवून आणि नंतर पळून गेले होते.
या खटल्यात सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी १७ साक्षीदार तपासले. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. ऋषिकेश गानू म्हणाले, फिर्यादी पक्षाने दाखल केलेला सर्व पुरावा खोटा असून तो मान्य नाही. तसेच, सर्व साक्षीदार हे बनावट असून त्यांची साक्ष खोटी असल्याचे युक्तिवादात सांगितले. अॅड. बारगजे यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी वकिलांना फिर्यादीतर्फे ॲड. सूर्यकुमार निरगुडकर, ॲड. ऋग्वेद निरगुडकर, आणि ॲड शशांक वकील यांचे सहाय्य लाभले. न्यायालयीन कामकाजात सहायक पोलीस फौजदार खानेकर, हवालदार काकडे, भुवड, मोरे यांनी मदत केली.