कॉसमॉस बँक फसवणूक प्रकरण: ७१ बँका, ४१ शहरांतून काढले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:27 AM2018-08-19T00:27:02+5:302018-08-19T00:27:42+5:30
कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़
पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़ त्याची संपूर्ण टेक्निकल माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे़ अडीच हजार व्यवहारांद्वारे देशातील विविध एटीएममधून सुमारे अडीच कोटी रुपये काढण्यात आले आहेत़ त्याची डाटा गोळा करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे असल्याने त्याला वेळ लागत आहे़
या प्रकरणात राज्यातील अनेक एटीएममधून प्रत्यक्षपणे पैसे काढण्यात आले असून, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचा तपास करण्यावर विशेष तपासाने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली़
कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेण्यात आले़ या प्रकरणी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे़ या पथकाने कॉसमॉस बँकेकडून ज्या ज्या शहरातील एटीएममधून पैसे काढण्यात आले़ त्या ठिकाणच्या एटीएमची माहिती मागविली आहे़ याबाबत ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले की, बँकेकडून आम्हाला पुणे, मुंबई, कोल्हापूर, इंदौर, मुंब्रा येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ मात्र, त्यातही या शहरातील नेमके कोणत्या एटीएममधून हे पैसे काढले गेले, याची सविस्तर माहिती आम्ही मागविली आहे़ त्यादृष्टीने काही एटीएमच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली आहे़ त्या एटीएममधील सीसीटीव्ही चे फुटेज शोधण्याचे काम सुरु असून ते फुटेज सुपर इम्पोझ करुन त्याची तपासणी करीत आहेत़ त्याचवेळी संबंधितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असून ते पैसे बँकेच्या खातेदारानेच काढले की परस्पर दुसऱ्याने काढले याची शहानिशा करण्यात येत आहे़
कॉसमॉस बँकेकडून आणखी टेक्निकल डाटा मागविण्यात आला आहे़ एटीएम मधील केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले असतात़ त्यावरुन काढण्यात येतात़ मात्र, ते काहीसे अंधुक असतात़ याशिवाय एटीएम मशीन पैसे काढले जात असताना एक स्किन शॉर्ट घेते़ त्यामध्ये अधिक चांगली प्रतिमा येत असते़ ज्या एटीएम मशीनमधून पैसे काढले गेले आहेत़ त्यांचा स्क्रीनशॉटही मागविण्यात येत आहे़