कॉसमॉस बॅँक फसवणूक प्रकरण: ग्राहकांच्या क्लोनकार्डच्या सूत्रधाराचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:10 AM2018-08-24T05:10:51+5:302018-08-24T05:11:11+5:30
भारतासह पोलंड, रशिया, यूएई, कॅनडा, चीन, इंग्लंड, अमेरिका, टर्की अशा विविध २८ देशांत ७८ कोटी रुपये प्रत्यक्षरीत्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन व्हिसा कार्डद्वारे १२ हजार आर्थिक व्यवहारांद्वारे काढण्यात आले आहे
पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारून व्हिसा आणि रुपी कार्डच्या माध्यमातून ९४ कोटी ४२ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी व्हिसा आणि रुपी कार्डचे मोठ्या प्रमाणावर क्लोन कशा प्रकारे करण्यात आले, कार्ड नंबर आणि पिन कोणत्या स्वरूपात तयार झाले, यामागे संगनमताने कट रचलेल्या सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे़
भारतासह पोलंड, रशिया, यूएई, कॅनडा, चीन, इंग्लंड, अमेरिका, टर्की अशा विविध २८ देशांत ७८ कोटी रुपये प्रत्यक्षरीत्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन व्हिसा कार्डद्वारे १२ हजार आर्थिक व्यवहारांद्वारे काढण्यात आले आहे. त्यामुळे हे पैसे नेमके कोणी काढून नेले आहेत, याबाबत संबंधित एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळावे तसेच आरोपींबाबत काही धागेदोरे हाती लागण्याकरिता एसआयटीमार्फत २८ देशांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच, भारतातही इंदूर, अजमेर, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकूण २ हजार ८०० व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपये रुपी कार्डद्वारे एटीएममधून काढण्यात आले आहेत.
बँकेच्या सिक्युरिटी सिस्टीम आणि आॅडिटमध्ये काही त्रुटी राहिल्याचे दिसून येत असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले़
याबाबत कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले, ‘‘तपासातून पुढे येत असलेल्या बाबींबद्दल अद्याप बँकेला कल्पना देण्यात आलेली नाही.’’
काही सेकंदांत झाले अनेक व्यवहार
संबंधित कार्डचा वापर करताना कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांच्या
कार्डची माहिती कशा प्रकारे चोरी झाली आहे, तसेच त्याचे
क्लोन कार्ड कसे तयार करण्यात आले, याबाबत पोलीस तपास
करीत आहेत.
चौकशीदरम्यान काही ठिकाणी बँकेच्या मुदत संपलेल्या कार्डचाही वापर झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, एटीएम सेंटरमध्ये काही सेंकदांत अनेक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नेमकी फसवणुकीची सुरुवात कुठे आणि कशा प्रकारे झाली, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.