Cosmos Bank | कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याप्रकरणी जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:53 PM2022-12-28T12:53:59+5:302022-12-28T12:55:02+5:30
२०१८ मध्ये झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला...
पुणे : कॉसमॉस सहकारी बँकेवर २०१८ मध्ये झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. आरोपीने बँकेच्या ग्राहकांचे दहा एटीएम कार्ड क्लोन करून ७ लाख ८० हजार रुपये काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला.
महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. भोकर, नांदेड) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह १८ जणांवर फसवणुकीसह भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ ते १३ ऑगस्टदरम्यान घडली होती. त्यावेळी कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील मुख्यालयात असलेल्या ‘एटीएम स्विच’वर (सर्व्हर) आरोपींनी ‘मालवेअर’चा हल्ला करून बँकेच्या काही व्हिसा व रूपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरली. त्याद्वारे बँकेचे ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरले, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी राठोड याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपी राठोड हा बनावट कार्डद्वारे एटीएममधून रक्कम काढताना सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे. त्याने इतर आरोपींशी मिळून हा गुन्हेगारी कट केला. त्याने चोरलेली रक्कम जप्त करायची आहे. आरोपींचा गुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचविणारा आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील अगरवाल यांनी केला.