जलवाहिनीसाठी पावणे दोनकोटींचा खर्च
By admin | Published: November 16, 2015 01:54 AM2015-11-16T01:54:57+5:302015-11-16T01:54:57+5:30
पंप हाऊसमधील पंपांचे नूतनीकरण, जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे या विविध ठिकाणच्या तीन कामांसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत
पिंपरी : पंप हाऊसमधील पंपांचे नूतनीकरण, जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे या विविध ठिकाणच्या तीन कामांसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेत होणाऱ्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या भोसरी, लांडेवाडी पंप हाऊसमधील दिघी रोड येथील पंपाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ७४ लाख ६८ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. एका ठेकेदाराने वीस टक्के कमी दराची निविदा या कामासाठी सादर केली आहे. यासह लांडेवाडी पंप हाऊसमधील आळंदी रोड येथील पंपाचेही नूतनीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४८ लाख ४४ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी ठेकेदाराने २२ टक्के कमी दराची निविदा सादर केली आहे.
तसेच सेक्टर क्रमांक २३ आणि २६ मधील दुर्गेश्वर पथ या परिसरात ठिकठिकाणी जलवाहिनी टाकणे, जोड करणे, व्हॉल्व्ह बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी २० टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली आहे. या तिन्ही कामांसाठी एक कोटी ६५ लाखांचा खर्च येणार असून, त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
त्रिवेणीनगर चौकापासून सहयोगनगरमध्ये जाणाऱ्या बारा मीटर रस्ता विकसित करणे तसेच पावसाळी गटार योजना तयार करण्याच्या ४१ लाखांच्या खर्चाचा विषय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)