उसाला प्रतिटन ३००० रुपये भाव
By admin | Published: July 24, 2016 05:43 AM2016-07-24T05:43:13+5:302016-07-24T05:43:13+5:30
दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून, उसाचा चारा व नवीन आडसाली लागवडीसाठी विक्री करीत, प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांची कमाई करण्याचा नवा फंडा पाणलोट क्षेत्रातील ऊस
इंदापूर : दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून, उसाचा चारा व नवीन आडसाली लागवडीसाठी विक्री करीत, प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांची कमाई करण्याचा नवा फंडा पाणलोट क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे नेहमीच्या दुष्काळाची तीव्रता अधिकच भयानक केली होती. त्यातच पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. राजकीय पक्षांनी त्याच्याविरोधात आवाज उठवला. शेतकऱ्यांनी त्यांना खंबीर साथ दिली. वीजकपातीचा निर्णय शिथिल करून पाच तास वीजपुरवठा करण्याचे शासनाने जाहीर केले. निर्णयाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन, आहे त्या पाणी व वीजपुरवठ्यावर पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस चांगला जोपासला. तथापि यंदाच्या जूनमध्ये पावसाने ‘ये रे माझ्या मागल्या’चाच कित्ता गिरवला. चाऱ्याची टंचाई भीषण झाली. उसाचाच चारा म्हणून वापर करणे अपरिहार्य झाले. ऊस चांगला जोपासल्याने चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. चाऱ्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी पाणलोट क्षेत्रात येऊ लागले. चारा घेता घेता, नवीन आडसाली उसाच्या लागवडीसाठी उसाची मागणी करू लागले. दर चांगला देण्याची तयारी दाखवली. संकटातील या संधीचे पाणलोट क्षेत्रात पैसे झाले. (वार्ताहर)
वेळापूर, अकलूज, नातेपुते, फलटण भागातून मागणी येत आहे. प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांचा दर मिळतो आहे. तुटून गेलेल्या उसाचा खोडवा चांगल्या रीतीने सांभाळून या वर्षी कारखान्याला घालण्याची खबरदारीही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे. उसाचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग करू नये. उसामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. - राजेंद्र वाघमोडे, संचालक, म. फुले कृषी विज्ञान केंद्र