पुणे मेट्राेचे डबे पिंपरी - चिंचवडमध्ये दाखल ; नागरिकांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 08:01 PM2019-12-29T20:01:55+5:302019-12-29T20:03:09+5:30
पुणे मेट्राेचे डबे नागपूर येथील कारखान्यातून पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले असून नागरिकांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचे प्रवेशद्वार असणाऱ्या निगडीतील भक्ती- शक्ती चौकात पुणेमेट्रोचे नवीन डबे आल्यानंतर मेट्रोच्या कामगारांनी ढोल ताशांचा दणदणाट करून स्वागत केले. शिंदेशाही पगडी आणि फेटे कामगारांनी परिधान करून ढोल आणि तुतारीच्या गजरात डब्यांचे स्वागत केले. वाजत गाजत शहरात मेट्रोचे डबे आणण्यात आले.
स्वारगेट ते पिंपरी या टप्यातील पिंपरी ते दापोडी या मेट्रोमार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे. दापोडीपर्यंत ट्रॅक तयार केला आहे. त्यामुळे मेट्रो रेल प्रशासनाने पहिल्या टप्यांची मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर मेट्रो स्टेशन उभारण्याचे कामही वेगात सुरू आहेत. पिंपरीतील एच ए कॉलनीजवळ शहराच्या महापौर उषा ढोरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मेट्रोच्या डब्यांचे पूजन केले. यावेळी मेट्रोचे उप अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनसंपर्क अधिकारी निवृत्त कर्नल नितिन जोशी, मेट्रोचे उप सुरक्षा अधिकारी गोरख भावसार आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्याची चाचणी होणार असून त्यासाठी आज डबे येणार होते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार निगडीतील भक्ती शक्ती चौकात आल्यानंतर मेट्रोच्या कामगारांनी ढोल ताशांचा दणदणाट करून स्वागत केले. शिंदेशाही पगडी आणि फेटे कामगारांनी परिधान केले होते. ढोल आणि तुतारीच्या गजरात डब्यांचे स्वागत केले. वाजत गाजत शहरात मेट्रोचे डबे आणले.
स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘शहरात आज मेट्रोचे चार डबे दाखल झाले आहेत. मेट्रो सेवा तातडीने सुरू होण्यासाठीचे हे महत्वाचे पाऊल आहे. सोमवारी दुपारनंतर क्रेनच्या साह्याने हे डबे मेट्रोच्या ट्रॅकवर ठेवण्यात येणार आहे. आत्ताच्या डब्यांची ९६० आसनांची व्यवस्था असणार आहे. तसेच पुढील आठवड्यात आणखी चार डबे येणार आहेत. ही सेवा नागरिकांनी लवकरच सुरू करून देण्यासाठी प्रयत्न असणार आहे.’’