रेंगाळलेल्या सभेत नगरसेवकांच्या डुलक्या
By Admin | Published: April 25, 2017 03:51 AM2017-04-25T03:51:50+5:302017-04-25T03:51:50+5:30
दौंड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तब्बल पाच तास चालली. रेंगाळलेल्या या सभेमध्ये काही नगरसेवक आणि नगरसेविका नुसते जांभया देत होते.
दौंड : दौंड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तब्बल पाच तास चालली. रेंगाळलेल्या या सभेमध्ये काही नगरसेवक आणि नगरसेविका नुसते जांभया देत होते. काहींना तर छानपैकी डुलक्याच लागल्या होत्या.
नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच विषयपत्रिकेवर ३१ विषय घेण्यात आल्याने सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा दुपारी ४ ला संपली.
सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या वेळी शहराच्या विकासासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले.
मात्र पाणीपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, राष्ट्रवादीचे
गटनेते बादशहा शेख, राष्ट्रवादीच्या नगरसेविका रिजवाना शेख
यांनी विरोध केला. मात्र
पाणीपट्टी वाढीचा ठराव मंजूर झालेला आहे. यात बदल करता येणार नाही. असे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका सर्वसाधारण सभेला उपस्थित होते.
दुपारची वेळ असल्याने सभा काहीकाळ थांबवून उपस्थितांनी अल्पोहार घेतल्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली.
सभेच्या सुरुवातीला गटनेते बादशहा शेख म्हणाले की, पाणीपट्टी वाढवू नका. यावर उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी म्हणाल्या एक दिवसाआड पाणी देतो आणि त्यावर पुन्हा पाणीपट्टी वाढविणे योग्य नाही.
रिजवाना शेख म्हणाल्या की, लोकांना पाणी मिळत नाही आणि तुम्ही खुशाल पाणीपट्टी वाढविता ही पाणीपट्टी रद्द झाली पाहिजे. नगरसेवक जीवराज पवार म्हणाले की, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तेव्हा गटतट विसरुन सगळ््याच नगरसेविकांच्या प्रभागात आणि शहरात रस्ते दुरुस्ती करण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले शहराच्या विकासासाठी योग्य ते नियोजन झाले पाहिजे.
नगरसेवक इंद्रजित जगदाळे म्हणाले त्याच त्याच ठेकेदारांना पुन्हा कामे देऊ नका, नवीन ठेकेदारांना संधी दिली तर विकासाचे काम दर्जेदार होईल. नगरसेवक शहानवाज पठाण म्हणाले की, गांधी चौक ते भाजी मंडई रस्ता झाला पाहिजे. याचबरोबरीने विठ्ठल मंदिर आणि आलमगीर मस्जिद यांना शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे.
रस्त्याची कामे दर्जेदार झाली पाहिजेत असे मत नगरसेवक गौतम साळवे मोहन नारंग यांनी मांडले.तसेच शहरातील मुख्य साडे चार कोटीच्या रस्त्यात भ्रष्टाचार झालेला आहे.
तेव्हा या रस्त्याच्या ठेकेदाराला काळ््या यादीत टाका असा प्रश्न पुढे आल्यानंतर नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड म्हणाले की, त्या ठेकेदाराला जेलमध्ये टाकल्याशिवाय पर्याय नाही शेवटी पैसा हा जनतेचा आहे.
नाना देशमुख, अरुणा डहाळे, प्रणोती चलवादी, अनिता दळवी, ज्योती वाघमारे, यांनी चर्चेत भाग घेतला. (वार्ताहर)