रिपाइं नगरसेवकांचे आंबेडकरांना अभिवादन
By Admin | Published: February 25, 2017 02:42 AM2017-02-25T02:42:02+5:302017-02-25T02:42:02+5:30
भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या रिपाइंच्या नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयाचा आनंद साजरा केला
पुणे : भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या रिपाइंच्या नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयाचा आनंद साजरा केला. आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आता विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करताना रिपाइंचे हे नगरसेवक स्वतंत्रपणे नोंदणी करणार की भाजपा नगरसेवकांच्या यादीतच त्यांचा समावेश होणार, असा प्रश्न आहे.
रिपाइं (आठवले गट) बरोबर महापालिका निडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने युती केली, मात्र त्यांना १० जागा सोडताना भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला लावली. रिपाइंच्या निवडणूक चिन्हाचा वाद असल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली. त्यावर टीका करीत अन्य काही पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाध्यक्ष, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार केली व त्यांनी निवडणूक लढवत असलेले उमेदवार व स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
मात्र त्यांनी ठाम राहत निवडणूक लढवली. त्यामुळे त्या १० पैकी ५ जागा निवडून आल्या. नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, तसेच नवनाथ कांबळे, फर्जाना शेख, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे यांचा त्यात समावेश आहे. या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी महेंद्र कांबळे, महेश शिंदे, बाळासाहेब जानराव, वसंत बनसोडे, असित गांगुर्डे, परशुराम वाडेकर, सुधाकर राऊत, पप्पू शेख, महिपाल वाघमारे, विशाल शेवाळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)