वकिलांसाठी शिवाजीनगर टपाल कार्यालयात स्वतंत्र काऊंटर :वारंवार रांगेत थांबण्याची कटकट थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:01 PM2019-01-07T19:01:53+5:302019-01-07T19:02:29+5:30
नोटीसा आणि रजिस्टर पोस्ट (आरपीडी) पाठविण्यासाठी टपाल कार्यालयात वाया जाणार वकिलांचा वेळ आता वाचणार आहे.
पुणे : नोटीसा आणि रजिस्टर पोस्ट (आरपीडी) पाठविण्यासाठी टपाल कार्यालयात वाया जाणार वकिलांचा वेळ आता वाचणार आहे. वकिलांना पाचपेक्षा जास्त टपाल पाठवता यावे, तसेच त्यांना वारंवार रांगेत थांबावे लागू नये म्हणून शिवाजीनगर टपाल कार्यालयात वकिलांसाठी स्वतंत्र काऊंटर सुरू करण्यात आले आहे.
कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते संध्याकाळी ५ असे दिवसातून दोन तास हे काऊंटर सुरू राहणार आहे. या वेळात वकिलांना त्यांच्या नोटीसा आणि रजिस्टर पोस्ट जमा करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या काऊंटरद्वारे एक वकिल कितीही टपाल पाठवू शक ता, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे (पीबीए) सचीव अॅड. संतोष शितोळे यांनी दिली. या बाबत सविस्तर माहिती देताना अॅड. शितोळे यांनी सांगितले की, वकिलांचा वेळ वाचवा यासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारातच टपाल खात्याचा एक काऊंटर देण्यात यावा, अशी मागणी असोसशिनकडून आॅक्टोंबरमध्ये करण्यात आली होती. मात्र शिवाजीनगरमध्ये टपालचे स्वतंत्र कार्यालय आहे. तर पुणे महानगर पालिकेच्या इमारतीमध्ये सध्या अशी सुविधा देण्यात येते. त्यामुळे दोन जवळची ठिकाणे असताना न्यायालयात काऊंटर सुरू करता येणार नाही, असे स्पष्टीकरण टपाल खात्याकडून देण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाऐवजी शिवाजीनगर येथील टपालाच्या कार्यालयातची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
वकिलांना अशिलांच्या प्रकरणात अनेकांना नोटीसा पाठवाव्या लागतात. तसेच रजिस्टर पोस्ट पाठविणा-यां वकिलांची संख्या देखील मोठी आहे. हे सर्व टपाल सर्वाधिकपणे शिवाजीनगर टपाल कार्यालयातून पाठवली जातात. मात्र ती जमा करीत असताना एका वकिलाने एका वेळी केवळ पाचच टपाल किंवा आरपीडी द्यावेत, असा नियम होता. त्यामुळे वकिलांना केवळ पाच टप्प्यात टपाल जमा करावे लागत व पाच पेक्षा जास्त टपाल असतील तर पुन्हा रांगेत थाबून पुढील पत्रे जमा करावी लागत. त्यामुळे वकिलांचा मोठा वेळ त्यात जात. ही सर्व अडचण आता स्वतंत्र काऊंटरमुळे दूर होणार आहे. दरम्यान न्यायालयात काऊंटर सुरू करण्याची मागणी अद्याप फेटाळण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात त्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असे अॅड. शितोळे यांनी सांगितले.
अॅड. संतोष शितोळे, सचीव, पुणे बार असोसिएशन :
याबाबत असोसिशनेच्या वतीन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. टपाल खात्याने घेतलेल्या या निर्णयामुळे वकिलांचा मोठा वेळ वाचणार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. वकिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा.