दोनशे रोडरोेमिओंचे समुपदेशन
By Admin | Published: November 18, 2016 06:00 AM2016-11-18T06:00:37+5:302016-11-18T06:00:37+5:30
हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या निर्भया पथकाने गेल्या काही दिवसांत
लोणी काळभोर : हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या निर्भया पथकाने गेल्या काही दिवसांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. रोमियोगिरी करणाऱ्या तब्बल २०० मुलांना आई-वडिलांसोबत कार्यालयात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान म्हणाल्या, ‘‘गेल्या ३ महिन्यांत तब्बल २०० मुलांवर या पथकाने कारवाई केली आहे. हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या निर्भया पथकात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, पोलीस कर्मचारी विनोद हाके (वेल्हा पोलीस ठाणे), वैजनाथ नागरगोजे (लोणी कंद पोलीस ठाणे), महिला पोलीस रेश्मा खंकाळ (लोणी काळभोर पोलीस ठाणे) व स्वाती जाधव (हवेली पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.
लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली व वेल्हा या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खासगी गाडीने व साध्या वेषात फिरून हे पथक कारवाई करते. प्रत्येक आठवड्यातील रविवार ते शुक्रवार या कालावधीत कारवाई केलेल्या युवकांना शनिवारी समुपदेशनासाठी आईवडील किंवा पत्नीसह बोलावले जाते. या निर्भया पथकाकडे छुपे कॅमेरे असतात. शाळा, महाविद्यालय, बाजार, महिला वसतिगृह, सिनेमागृह, उद्यान, बसस्थानक, रेल्वेस्थानक, विविध कंपन्या, ज्या ठिकाणी महिला, मुली असतात, तेथे जाऊन हे पथक छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छेडछाडीचे रेकॉर्डिंग करण्यात येते. नंतर सदर युवकाला आपले आईवडील किंवा पत्नीला सोबत घेऊन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथे असलेल्या हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात शनिवारी बोलावले जाते. तेथे त्याचे समुपदेशन केले जाते.