मोजणी कार्यालय खासगी लोकांचा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:18 AM2018-10-05T01:18:00+5:302018-10-05T01:18:18+5:30
कामातही हस्तक्षेप : सरकारी दप्तराची राजरोस हाताळणी
खेड : खेड तालुका भूमी अभिलेख कार्यालय (मोजणी कार्यालय) जणू खासगी लोकांच्या ताब्यात आहे. सरकारी दप्तर हाताळणी, कार्यालयीन कामकाजात या खासगी लोकांचा हस्तक्षेप आहे. हे गंभीर असून या कार्यालयातील सरकारी दस्त किती सुरक्षित हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेड तालुक्यातील प्रकल्प, औद्योगिकीकरण आणि त्या अनुषंगाने जमिनीचे मोठे व्यवहार खेडमध्ये होत आलेत. आजही सर्वाथार्ने खेड प्रॉपर्टीच्या संदर्भात ह्यहॉट डेस्टिनेशनह्ण आहे. त्यामुळे मोजणी कार्यालयात खातेदारांचा राबता मोठा असतो. या कार्यालयात सतत गर्दी असते. दरम्यान, कार्यालयातील प्रकार फारसे समाधान कारक नाहीत. खाजगी माणसे येथे अलिखित नियुक्तीस आहेत. त्यांचा स्वैर वावर खातेदारांच्या दस्तांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. खाजगी माणसे दस्त हाताळतात तसेच सरकारी कामेही करीत असल्याचे दिसते. एक सेवानिवृत्त व्यक्तीही आपली सेवा निवृत्तीनंतरही देत आहे, हे विशेष! लेखनिकाच्या हाताखाली असणारी ही खाजगी माणसे जणू मोजणी कार्यालयाचा कारभार चालवत असल्याचे दिसते. मोजणी नकाशे तयार करणे, चलने तयार करणे,नकला बनविणे, सरकारी दस्त तयार करणे अशी कामे करीत असल्याचे पहाण्यास मिळते. कार्यालयात सरकारी व्यक्ती कोण आणि खाजगी माणसे कोण याबाबत कार्यालयात स्पष्टता येत नसल्याने गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे. कोणीही यावे आणि थेट आत अभिलेख कक्षात जावे, असा सावळा गोंधळ येथे पहाण्यास मिळत आहे.
एक शिपाई सबसे सवाई...
मोजणी कार्यालयात काम असेल तर एका शिपायास सांगा, हात ओले करा आपणास सेवा मिळेल, असे अलिखित समीकरण आहे. मुक्तहस्ताने हा शिपाई आपली सेवा मेव्याच्या बदल्यात देत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे साहेबांपेक्षा शिपायास येथे महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येते.
खासगी लोक हाताळतात
सरकारी कागद
दलालांचा स्वैर वावर
दस्तांच्या सुरक्षिततेचा
प्रश्न ऐरणीवर
खासगी माणसांबद्दल कोणाच्या तक्रारी आलेल्या नाहीत. अशी काही खासगी माणसे नाहीत. तसे असेल तर माहिती घेतली जाईल.
- उमेश झेंडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खेड