नारायणगावला तणावपूर्ण वातावरणात मोजणी

By admin | Published: August 27, 2015 04:44 AM2015-08-27T04:44:30+5:302015-08-27T04:44:30+5:30

खेड-सिन्नर बाह्यवळणासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नारायणगाव येथे आज भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजणी सुरू करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने

Counting in stressed environment in Narayanga | नारायणगावला तणावपूर्ण वातावरणात मोजणी

नारायणगावला तणावपूर्ण वातावरणात मोजणी

Next

नारायणगाव : खेड-सिन्नर बाह्यवळणासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नारायणगाव येथे आज भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजणी सुरू करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून १५ जणांना ताब्यात घेतले़ यामुळे वारूळवाडी व नारायणगाव या शहरांत काही काळ तणावाचे वातावरण होते़
कारवाईच्या निषेधार्थ शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला़. काही तरुणांनी रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला़
खेड-सिन्नर या राष्ट्रीय राजमार्ग क्ऱ ५० चे चौपदरीकरण सुरू असून, नारायणगाव येथे बाह्यवळण होणार आहे़ या बाह्यवळणाकरिता सुमारे १०० शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी संपादन करण्यासाठी मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले असता, सकाळी दहाच्या सुमारास बाधित शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला. शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न जुन्नरचे प्रांताधिकारी कल्याण पांढरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाचे अधिकारी झोडगे यांनी केला. शेतकऱ्यांनी मोजणी करू द्यावी, यासाठी बाधित शेतकऱ्यांची बैठक कुकडी विश्रामगृहात सुमारे २ तास झाली़ मात्र, बाधित शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले; परंतु जिल्हाधिकारी राव यांनी चर्चा नंतर केली जाईल, आज मोजणीला सुरुवात करा, असा आदेश दिला़ त्या वेळी बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून पुन्हा रास्ता रोको केला. त्याबरोबरच पोलिसांनी बळाचा वापर करून माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, योगेश (बाबू) पाटे, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, महेश शिंदे, समीर मेहेत्रे, आशिष वाजगे, शंकर फुलसुंदर, योगेश वाघचौरे, आत्माराम पाटे, बाळकृष्ण पाटे, मारुती भुमकर, वैभव वाजगे, सनी पाटील आदी ३० ते ४० शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये टाकून नेले़ काही शेतकरी व कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन अडविण्याचा प्रयत्न केला़ तर, रस्त्यावर लाकडे टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नारायणगाव एसटी बस स्थानकासमोर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला़ त्यामुळे सुमारे दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़
या मोजणीला विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी प्रशासनाने मोजणी करण्याकरिता थोडी मुदत द्यावी व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे; अन्यथा भविष्यात याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा या वेळी दिला़
ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Counting in stressed environment in Narayanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.