मोजणी झाली, आमच्या भरपाईचे काय?

By admin | Published: September 21, 2015 04:09 AM2015-09-21T04:09:29+5:302015-09-21T04:09:29+5:30

प्रस्तावित खेड-सिन्नर रस्त्याच्या मोजणीचे काम प्रशासनाने मंचर परिसरात पूर्ण केले आहे़ शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करूनसुद्धा कुठलाही गैरप्रकार

Counting, what about our compensation? | मोजणी झाली, आमच्या भरपाईचे काय?

मोजणी झाली, आमच्या भरपाईचे काय?

Next

मंचर : प्रस्तावित खेड-सिन्नर रस्त्याच्या मोजणीचे काम प्रशासनाने मंचर परिसरात पूर्ण केले आहे़ शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करूनसुद्धा कुठलाही गैरप्रकार न होता मोजणी काम पूर्ण करण्यात आली. तालुक्यात आता मोजणीचे थोडेच काम बाकी राहिले आहे़ परंतु बाधित शेतकऱ्यांना नक्की किती भरपाई मिळणार, याबाबत मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे.
मोजणी झालेल्या क्षेत्राची प्रसिद्धी होईल, किती क्षेत्र गेले ते प्रसिद्ध केले जाईल़ त्यानंतर अ‍ॅवॉर्ड म्हणजे मोबदला किती दिला जाणार, त्याबाबत स्पष्टता केली जाईल़ हा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे़ मात्र, हा मोबदला किती मिळणार, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे़ जास्तीत जास्त मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. मात्र, शासकीय निकषानुसारच पैसे मिळणार, हेही तितकेच खरे आहे़ त्यामुळे या विषयी पारदर्शकता आणि सुस्पष्टता असावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
प्रस्तावित खेड-सिन्नर रस्त्याची घोषणा झाली, त्या वेळी बाह्यवळण हा मुद्दा वादाचा ठरला. शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला़ आंबेगाव तालुक्यात अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत़ अर्धा, एक एकर शेती असणारे बहुतेक शेतकरी आहेत़ याच शेतीवर व त्यावर अवलंबून असणाऱ्या दुग्धव्यवसायावर त्यांची उपजीविका चालते़ मंचर, मोरडेवाडी, शेवाळवाडी, एकलहरे त्याला अपवाद नाही़
या भागात अनेक वेळा यापूर्वी भूसंपादन झाले़ मंचर शहरातून गेलेला जुना व आताच्या नवीन पुणे-नाशिक महामार्गासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या़ बाजार समिती, एसटी बसस्थानक, शाळा-महाविद्यालय यासाठी स्थानिकांच्या जमिनी गेल्या़ डिंभे धरणाचा उजवा कालवा यातही अनेकांच्या जमिनी गेल्या आणि आताही बाह्यवळण रस्त्यात जमिनी जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले़
मंचर परिसरात जमिनीला आलेला भाव पाहता विरोध होणे अपेक्षित होते. शेतकरी संघटित होऊन त्याने वर्षभर तीव्र विरोध केला़ अनेक वेळा मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी पाठविण्यात आले़ मात्र, हा केंद्राचा विषय असल्याने नजीकच्या काळात प्रशासनाने मोजणीच्या कामावर लक्ष केंद्रित केले़ त्यासाठी शेतकऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली़
सुरुवातीस बाह्यवळण वगळता महामार्गालगतची मोजणी पूर्ण करण्यात आली व नंतर बाह्यवळण रस्त्याची मोजणी हाती घेण्यात आली़ बाह्यवळण रस्त्याच्या मोजणीला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला़ त्या वेळी प्रशासनाने समजुतीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे धोरण ठरविले़ शेतकऱ्यांची समजूत काढत बाह्यवळण रस्त्याची मोजणी झालीही.
मंचर शहराबरोबर शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी येथील मोजणी पूर्ण झाली़ निघोटवाडी येथील गट नं़ २० ची मोजणी झाली नाही़ कारण राजपत्रात त्याची प्रसिद्धी झाली नव्हती़ आता नारायणगाव येथील एक गट व निघोटवाडी येथील गट नं़ २० बाबत प्रोसेस सुरू
झाली आहे़ राजपत्रात प्रसिद्धी
होऊन मग मोजणी होईल़
पुरवणी प्रस्ताव केंद्राला सादर
केला जाईल़
खेड-सिन्नर रस्त्याचे काम इतर ठिकाणी वेगाने सुरू आहे़ मात्र, तालुक्यात अजून कामाने वेग पकडलेला नाही़ हा रस्ता तातडीने मार्गी लागावा, यासाठी शासकीय यंत्रणेवर मोठा दबाव आहे व तो असल्याचे अधिकाऱ्यांनी अनेकदा कबूलही केले आहे़ (वार्ताहर)

दोन एकर शेत जमीन बाह्य वळण रस्त्यात जाणार आहे. शासन भरपाई किती देणार याबाबत अद्याप स्पष्टता आहे. जी भरपाई मिळेल ती तुटपुंजीच असणार आहे. शासनाने भरपाई दिली तरी त्या पैशात दुसरी जमीन घेऊ शकणार नाही. या अगोदर आम्ही अशा जमिनी तीन वेळा दिल्या आता ही चौथी वेळ आहे. बाह्य वळण होऊ नये म्हणून आम्ही न्यायालयात धाव घेणार आहे. वेळेप्रसंगी उपोषणाला बसण्याची तयारी केली आहे.
- सतीश भेंडे,
बाधित शेतकरी
४आंबेगाव तालुक्यात अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत़ अर्धा, एक एकर शेती असणारे बहुतेक शेतकरी आहेत़ याच शेतीवर व त्यावर अवलंबून असणाऱ्या दुग्धव्यवसायावर त्यांची उपजीविका चालते़
खेड-सिन्नर रस्त्याबाबत
आज बैठक
मंचर : खेड-सिन्नर प्रस्तावित बाह्यवळण रस्त्यासंदर्भात जिल्हाअधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांची सोमवारी घोडेगाव येथे बैठक होणार आहे.प्रस्तावित खेड-सिन्नर बाह्यवळण रस्त्याला मंचर, तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, मोरडेवाडी, एकलहरे येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यासंदर्भात घोडेगाव येथे सोमवार, दि. २१ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जिल्हाधिकारी , भू-संपादन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सरपंच नीलेश थोरात यांनी दिली. बाधित शेतकऱ्यांची मंचर येथे आज बैठक झाली. त्या वेळी सतीश बेंडे, नीलेश थोरात, सचिन खानदेशे, गणेश खानदेशे, राजू बाणखेले, संदीप बेंडे, सचिन चिंचपुरे, शैलेश बाणखेले, दिलीप बाणखेले, प्रमोद बाणखेले आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Counting, what about our compensation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.