महिला सुदृढ, सशक्त असतील तरच देशाची उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:12 AM2021-03-01T04:12:34+5:302021-03-01T04:12:34+5:30
पुणे : महिला सुदृढ व सशक्त असतील तरच देश किंवा समाज उन्नती करु शकतो. महिलांनी स्वत:चे आरोग्य चांगले राहावे, ...
पुणे : महिला सुदृढ व सशक्त असतील तरच देश किंवा समाज उन्नती करु शकतो. महिलांनी स्वत:चे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करायला हवेतच; परंतु, त्यासोबतच कुटुंबातील पुरुषांनीही महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बांगड यांनी व्यक्त केले.
जेधे सोशल वेल्फेअर फाऊंडेशन आणि रक्ताचे नाते ट्रस्ट, महाराष्ट्रतर्फे रक्तदान शिबिर, महिलांसाठी मोफत स्तन आरोग्य पूर्वतपासणी आणि आजार निदानासाठी कार्ड वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन येथे घेण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पुणे शहराध्यक्ष स्वाती पोकळे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, आयोजक फाऊंडेशनच्या अध्यक्षा अॅड. ॠचा जेधे, कान्होजी जेधे उपस्थित होते. खासदार गिरीष बापट, माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक आदींनी शिबिरस्थळी भेट दिली.
बांगड म्हणाले, ‘देशासह महाराष्ट्रात देखील ४० वर्षे वयावरील महिलांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्याचे पूर्वनिदान केले गेले, तर वेळ, पैसा, मनस्ताप वाचेल. इलाज वेळेवर करुन त्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होईल. यासाठी येत्या वर्षभरात १० हजार महिलांचे पूर्वनिदान करण्याचे रक्ताचे नाते ट्रस्टने योजिले आहे. रक्तदानासोबत ही मोहीमदेखील मोठ्या प्रमाणात राबवली जाईल.’